का शिवायचं नाय ? असा जर प्रश्न लहाणपणी विचारला, तर उत्तर मिळायचं की; कावळा शिवून गेलाय. बरं! मग कधी रात्रीच्या वेळी असं शिवायचं झालं, तर प्रश्न पडायचा. 🤔 रात्रीचं कसा कावळा येत असेल ?
नंतर मित्रांकडून काही माहिती मिळाली. १२ वीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात ज्याला 'मासिक पाळी' (menstruation) म्हणतात, त्याबद्दल शास्त्रीय आणि खरी माहिती मिळाली. ती अशी की, वयाच्या १३ ते १५ वर्षांपासून मुलींमध्ये हे सुरू होतं. महिन्यातून २ ते ७ दिवस स्त्रीच्या योनीतून रक्तस्राव होतो.
आता येवूया मूळ मुद्द्याकडे...
असं जर असेल आणि हे नैसर्गिकरीत्या घडत असेल, तर मग मुलींनी वेगळं बसायची प्रथा का ? त्याचे फायदे-तोटे काय ?
माझ्या मते, पूर्वीच्या काळी आतापेक्षा स्रियांना शेतातील आणि घरातील अशी खूप कष्टाची कामं असायची. पण या मासिक पाळीच्या दरम्यान मुलींना थकवा जाणवतो. तसेच, पोटदुखी आणि पाठदुखीही जाणवते. त्यामुळे त्यांना आराम मिळावा, म्हणून ही प्रथा असू शकते. दुसरी शक्यता म्हणजे, या मासिक पाळीमुळेच स्त्रियांच्या अंडाशयाची वाढ होत असते, जे की गरोदर राहण्यासाठी आवश्यक असतं. पण या दरम्यान जर शरीरसंबंध ठेवले, तर ते धोकादायक ठरू शकतं. म्हणून काहीशा वेगळ्या स्वरूपात लांब राहण्याची प्रथा असेल.
मला काय म्हणायचं आहे ?
मी हे लिहिलं, यासाठी की ज्या स्रिया वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांचं लग्न होवून काही वर्ष झाली असतील, त्यांना वेगळं रहायचं काही वाटत नसेल. पण ज्यांना नुकतंच हे सुरू झालेलं आहे आणि ज्या मुली तरूण आहेत, त्यांना या गोष्टीची लाज वाटते. घरी कोण आलं, तर चारचौघात न मिसळता त्यांना वेगळं बसावं लागतं. इतर वेळी, सर्वांबरोबर मिळून खेळता येतं. मात्र, आता वेड्यागत नुसतं एकटीने बसायचं. त्यात महत्वाचं म्हणजे, थंडी असली तरी त्यांना अंथरूण वगैरे थोडंच मिळतं, कारण शिवल्यामुळे ते नंतर धुवावं लागतं. एक माणूस म्हणून, ही खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.
गैरसमज -
शिवताशिवत केली की, घरात गोम, विंचू निघतात.😂
हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, ते पाळावं लागतं. मग माझा प्रश्न, १) पहिलं नवरा मेल्यानंतर बायकोलाही जिवंतपणे तीच्या मुलांसमोर जाळायचे.
२) पहिलं मुलींना शिक्षण देणं, म्हणजे पाप होतं.
३) दवाखान्यात गेल्यावर आणि सुई टोचल्यावर विटाळ व्हायचा.
अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या काळानुसार बदलल्याच ना ? काळानुसार आपल्यामध्ये बदल करत जाणं, यालाच तर 'उत्क्रांती' म्हणतात ना. कोणत्याही गोष्टी अंधपणाने स्वीकारण्यापेक्षा त्याची शहानिशा करायला हवी. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्या गोष्टीकडे पहायला हवं. घरच्यांशी या बाबतीत स्पष्टपणाने बोलायला हवं. आपल्यावर लादलेली अन्यायकारक गोष्ट निमूटपणानं सहन करणं, हे एकप्रकारे गुलामगिरीचंच लक्षण आहे.
- प्रतिक दत्तलता होले