Thursday, 28 May 2020

ती आणि तो :- गोष्ट त्या दोघांची (भाग २)

शाळेतल्या अभ्यासक्रमाबरोबरच तो नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचीही कसून तयारी करत होता. त्या परीक्षेला पुढील इयत्तांचे गणिताचे प्रश्न असायचे. त्याचे गणिताचे शिक्षक सुद्धा खूप छान पद्धतीने शिकवत असल्यामुळे त्याचं गणित एकदम उत्तम होतं. त्याच्या गावातील वयाने मोठे असणाऱ्या १-२ मित्रांकडून सुद्धा त्याने मार्गदर्शन घेतलं होतं. वर्गातील गृहपाठ वगैरे काही तो करत नसायचा. शिक्षकांना त्याने सांगितलं होतं की, मी नवोदयची तयारी करत असल्यामुळे मला शाळेतील अभ्यासाला जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे शिक्षक त्याला शिक्षा करत नसायचे. पण एवढ्या कष्टाने, जिद्दीने तयारी करूनही तो नवोदयच्या यादीत क्रमांक मिळवू शकला नाही. त्याच्याबरोबरच उन्हाळी तासात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या त्या 'अ' तुकडीतील मित्राला मात्र प्रवेश मिळाला. तो यामुळे खूपच निराश झाला. मित्रांनी नवोदयचं विचारलं की, ते सांगताना त्याच्या डोळ्यांत आपोआप पाणी यायचं. 


इकडे मात्र ती दररोज त्याला जागा पकडायची. दोघे एकाच सीटवर बसून गप्पा मारत घरी जायचे. शाशिच्या तासाला दोघे एकमेकांकडे पाहत एकमेकांची थोडीशी चेष्टा करत, बोलत बोलत पूर्ण मैदान फिरून यायचे. तो सुरपाट, कबड्डी, खो-खो खेळताना ती दूर झाडाखाली थांबून त्याला पाहत रहायची. तोही मग मुद्दाम तिच्याकडे पाहत तिला इम्प्रेस करण्यासाठी इतर मुलांवर दादागिरी वगैरे करायचा. सर्व खेळांत मग कर्णधार पद तो स्वतःकडेच घ्यायचा. त्याच्या आईला शिवायचं नसेल तेव्हा ती त्याला स्वतःचा डबा खायला द्यायची. कधीकधी तर तीच्या मैत्रीणींसोबत तो तीच्या गटात एकटाच जेवायला जायचा. तो गणितात हुशार असल्याने ती त्याच्यापेक्षा २ वर्षांनी मोठी असूनही तो तिची गणितं तीला समजावून सांगायचा. असंच आनंदात, मजेत एकेक दिवस पुढे सरकत होता. 

ती आठवीत आणि तो सहावीत होता, तेव्हा ५वी ते ८वी शाळा दुपारच्या सत्रांत असायची. ती नववी आणि तो सातवीत गेल्यानंतर ५वी ते ७वी दुपारी आणि ८वी ते १०वी सकाळच्या सत्रांत, असं वेळापत्रक त्यांना सोयीस्कर असंच बदललं होतं. तो सातवीत असताना ती नववीत होती, त्यावेळी शाळेची वेळ वेगवेगळी असल्यामुळे त्यांना काही जास्त भेटता येत नव्हतं.

सातवीच्या वार्षिक परीक्षेत एका गुणामुळे त्याला प्रथम क्रमांक मिळू शकला नाही. त्याला नवोदयमध्ये यश मिळालं नव्हतं. मात्र त्या जीव लावून केलेल्या अभ्यासामुळे त्याला सातवीच्या शिष्यवृत्ती, आठवीच्या NMMS परीक्षेत अभ्यास न करताही यश मिळालं होतं. केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही, हे मात्र त्याला आता पक्कं समजलं होतं. ती दिसायला सुंदर होती, मात्र अभ्यासात मध्यमच होती. तो अभ्यासात खूप हुशार आणि ती दिसायला खूप सुंदर असल्याने सर्वांमध्ये साहजिकच त्यांच्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगली होती. तीच्या वर्गातील काहीजण तर त्याला उपहासाने विचारायचे की, "व्हंय. तीनं तुला प्रपोज केलाय काय ?" तो मात्र 'नाही' म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा.

तो आठवीत गेल्यानंतर त्याच्या शिष्यवृत्तीच्या पैशांमध्ये वडिलांनी अजून पैसे टाकून त्याला अँड्रॉईड फोन घेऊन दिला होता. ती दहावीत होती. तीही तीच्या वडिलांच्या व्हॉट्स अपवरून वडिलांच्या नकळत त्याच्याबरोबर बोलत होती. आठवीत आल्यापासून त्याच्यात पौगंडावस्थेची लक्षणं दिसायला लागली होती. त्याला आता तिच्याबद्दल शारिरीक आकर्षण सुद्धा वाटत होतं. तीला तर तो पहिल्यापासूनच आवडत होता. तो आता व्यवस्थित टापटीप राहत होता. कपड्यांना इस्त्री करायचा, सारखं सारखं कंगव्याने केस विंचारायचा, रूमालात पावडर ठेवायचा, दररोज शाळेत जाताना बूट स्वच्छ पुसल्याशिवाय घालत नव्हता. तीच्याही चेहऱ्यावर थोड्याशा तारूण्यपिटीका आल्या होत्या. शरीराला आकर्षक आकार प्राप्त झालेला होता.

प्रथम सत्राच्या काही दिवस अगोदर तो आणि त्याचे मित्र स्टँडवर बसले होते. ती आणि तीच्या मैत्रीणीही होत्या. आता मात्र दोघेही घरी जायची घाई करत नव्हते. एकमेकांचा हातात हात घेऊन भविष्याची आशादायक चित्रेही ते कधीकधी रंगवत होते. त्यादिवशी तीच्या वर्गातील काही मुलं मुद्दाम त्याच्या नावाने तीला चिडवत होते. दुसऱ्या दिवशी, तीने प्राचार्यांकडे त्या मुलांची तक्रार केली. प्राचार्यांनी त्या मुलांना ताकीद दिली. नंतर त्यांच्यातील एकजण त्याला येऊन म्हणाला, "काय लका, आधी नाय का सांगायचं. ती तुझी बहीण लागते म्हणून!" तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. मित्रांबरोबर आणि घरीही आता तो कोणाला जास्त बोलत नव्हता. एकएकटा राहत होता. तो तीला टाळायला लागला. तीच्यापासून दूरदूर रहायला लागला होता. 

एका आठवड्याने दुपारी तीचा फोन आला आणि तीने विचारलं, "का रे असं वागतोयंस ?" 
तो :- मी भाऊ आहे तुझा ??
ती :- हो...
तो :- मग ठेवतो मी फोन. 😡😠
ती :- अरे थांब... गंमत केली यार... 😃
तो :- मी तुझ्याकडे कधीच बहीण म्हणून पाहिलं नाही. 😥
ती :- अरे मग, मी काय सांगणार होते सरांना ? मी मुद्दाम त्यांना खोटं सांगितलं. 😇
तो :- खरं म्हणतीयेस ना तू ?
ती :- हो रे बाबा. 🤗
तो :- I  really love you ❤ very much dear.
ती :- मला पण तू खूप आवडतोस रे. Same to you my heartbeat.

प्रथम सत्राची परीक्षा झाली. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या. तो हुशार आहे आणि आम्ही दोघे मित्र आहोत, हे तीने तीच्या आईला सांगितलं होतं. तीच्या आईने त्याला दिवाळीचा फराळ खायला आणि घर पहायला बोलवलं. हुशार आहे म्हटल्यावर आपल्या मुलीला अभ्यासाचं सुद्धा काहीतरी सांगेल, हा भाबडा आशावादही तीच्या आईच्या मनात होताच. तो तीच्या घरी गेला. बाहेरून त्याने हाक दिली. तीच्या मोठ्या भावाने दार उघडलं. तो डिप्लोमाला होता. इतक्यात ती आली आणि तीने त्याला आत घेतलं. तीच्या आईने त्याला फराळ दिला. त्याला फराळ जास्त आवडत नव्हता, पण तीच्या कुटुंबियांबरोबर बोलत बोलत त्याने कसाबसा तो संपवला. काही वेळेनंतर तीचे वडील आणि भाऊ शेतात गेले. ती त्याला म्हणाली, "चल तुला टेरेस दाखवते". काहीही न बोलता तोही शांतपणे तीच्या मागोमाग टेरेस वरती गेला. 

ब्लॅक नाईट पँट आणि पिंक टी-शर्ट, मोकळे सोडलेले आणि टेरेस वरती वाऱ्यामुळे उडणारे तीचे ते कुरळे केस यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे एकटक पाहत ऊन्हातच थांबला होता. ती लहान आवाजात त्याला म्हणाली, "अरे वेड्या... माझ्याकडे काय पाहतोयस! ऊन्हाने पाय भाजत असतील ना!  त्याने फक्त नकारार्थी मान डोलावली. तीने त्याला एका हाताने तीच्या आत असणाऱ्या अभ्यासाच्या खोलीत ओढलं आणि तीला काही कळायच्या आत त्याने त्याचे 👄💋 ओठ तीच्या ओठांवर टेकवले. तीने डोळे मिटून घेतले. त्याने तीचा दुसरा हात हातात घेतला आणि ओठात ओठ घालून तो तीच्या रसाळ ओठांचा आस्वाद घेऊ लागला. पायऱ्यांवरून कोणीतरी वरती येत असल्याचा तीला आवाज आला आणि तीने त्याला दूर सारलं. अनपेक्षित आणि इतक्या चटकन घडलेल्या या प्रसंगाने तो भलताच खूष झाला होता, तर तीची धाकधूक वाढलेली होती. तो लगेच तिथून त्याच्या घरी निघून गेला. 

आता मात्र दोघांच्याही अंतिम परीक्षा जवळ आल्या होत्या. दोघेही भरपूर अभ्यास करायला लागले. परीक्षा झाली. त्याला यावेळी ७ गुणांनी प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. तीचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव त्याला माहित असल्याने त्याने स्वतःच्या मोबाईलवर तीचे गुण पाहिले. तीला ८९.३४℅ मिळाले होते आणि विशेष म्हणजे, गणितात ९४ गुण होते. तीचा शाळेत पाचवा आणि गणितात प्रथम क्रमांक आला होता. त्याने लगेच तीला अभिनंदन करण्यासाठी फोन केला, पण फोनच लागेना. तो दिवसभर फोन लावत राहिला, पण फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेरच. तो दुसऱ्या दिवशी तीच्या घरी जाऊन आला, तर घरालाही कुलूप. बक्षीस वितरण समारंभालाही ती आली नाही. त्याने तीच्या सर्व मैत्रीणींना विचारलं, पण त्यांनाही काहीच माहिती नव्हतं. त्याने आतापर्यंत कित्येक वेळा तीला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर शोधलं. पण खिन्न मनाने, 😓 वेड्यासारखा तीचा शोध तो अजूनही घेतोय.

------------ कथामालिका समाप्त ------------

- प्रतिक दत्तलता होले

Monday, 25 May 2020

ती आणि तो :- गोष्ट त्या दोघांची

पाचवीला सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्यासाठी चौथीनंतर उन्हाळी तास असायचे. त्यामध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांची प्रत्येकी २५ गुणांची दोनवेळा चाचणी व्हायची. त्या चाचणीमध्ये त्याला आणि त्याच्या एका मित्राला सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. (पण गंमत अशी की, त्यातील ५ गुण हे त्याने कॉपी करून मिळवलेले होते. मात्र त्याने हे कोणालाही कळू दिलं नव्हतं.) प्रथम आलेले ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्रही होते आणि तितकेच उनाड सुद्धा. ११ वाजता तास संपल्यानंतर अश्लील गप्पा मारणे, एकमेकांना शिव्या देणे, विचित्र विनोद करणे; असे उद्योग त्यांचे दररोजच चालायचे. 

तो एकदम विचित्र रहायचा. सकाळी विंचरलेल्या केसांकडे परत पाहत सुद्धा नसायचा. पायात पावसाळी चप्पल, खिशाला २ रूपयांचा पेन, त्याच्यातून खिशाला लागलेली शाई, गडबडीत एसटीत चढताना थोडीशी फाटलेली शाळेची हाफ पॅन्ट, पॅन्टची चेन खराब झाल्यामुळे चेनऐवजी लावलेलं बटन आणि या सर्वांच्या जोडीला त्याचे दुसरे दोन मित्र. तेही त्याच्यासारखेच. तिघे मिळून कोणाचीही चेष्टा करायचे. इतरांना चिडवायचे. मुलींवर अश्लील टिप्पणी करायचे. त्या तिघांनी आणि त्याच्या इतर मित्रांनी दादागिरीसाठी एक छोटी गँग पण तयार केली होती. एकंदरीतच अभ्यासात हुशार, पण वैयक्तिक जीवनात एकदम बिनधास्त असणारा तो. 

एका महिनाभराच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली. त्या दोघांनाही समान (पैकीच्या पैकी) गुण असल्याने आडनावांनुसार त्याला 'ब' तुकडी मिळाली आणि त्याच्या मित्राला 'अ'. पहिल्या दिवशी बाक पकडण्यासाठीची धावपळ आणि साहजिकच त्यातून झालेली थोडीशी भांडणं. नंतर उंचीनुसार बसवल्यामुळे बैठक व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागला. एका महिनाभरात वर्गशिक्षक, इतर विषयांचे शिक्षक, नवीन मित्र यांच्या ओळखी झाल्या होत्या. प्रथम क्रमांकाचे अभिनंदन झाले आणि त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, "दणक्यात एन्ट्री झाली".

जुलैमध्ये त्याच्या एका मित्राच्या वाढदिवसाला मित्राबरोबर तो दुसऱ्या वर्गांतील शिक्षकांना चॉकलेट वाटत होता. त्यावेळी त्याला उन्हाळी तासाला असणारे एक शिक्षक 'सातवी-ब' या वर्गात शिकवत होते. त्यांनी त्याला बोलावून घेतलं आणि विद्यार्थ्यांना "या मुलाने उन्हाळी तासात पहिल्यांदाच पैकीच्या पैकी गुण मिळवलेत", असं सांगून त्याचे अभिनंदन करायला लावले आणि त्या वाढदिवस असणाऱ्या मुलाने त्यांना दिलेलं चॉकलेट सरांनी त्याला दिलं. एकदा त्याच्या एका मॅडमनी वर्गातील सर्व मुलांना गोंधळ घातल्याबद्दल हात वर करून उभे राहण्याची शिक्षा दिली होती. पण त्याला सोडून. कारण मॅडमचा त्याच्यावर विश्वास होता आणि मॅडम त्याचवेळी इतर मुला-मुलींना म्हणाल्या होत्या, "हा अष्टपैलू हिरा आहे". या दोन्ही प्रसंगाची साक्षिदार अर्थातच ती 👀 होती. पहिल्या प्रसंगात ती त्याच वर्गातील विद्यार्थीनी होती. तर दुसऱ्या प्रसंगी, ती मॅडमसाठी खडू घेऊन आली होती. त्यामुळे तीने ते पाहिलं होतं. 

शारिरीक शिक्षणाच्या (शाशि) तासाला 'सातवी- ब' आणि त्याचा वर्ग मैदानावर होता. तो त्याच्या मित्रांबरोबर 'चिरं-वांगे' खेळत होता. तो सुरपाट, खो-खो, कबड्डी, रवारवी या खेळांतही तरबेज होता. तो खेळत असतानाच ती तिथं आली. तो खेळण्यातच दंग होता. तो राज्य असणाऱ्या मुलाच्या अंगावरून ऊडी मारून अलीकडे आला आणि तेवढ्यात तीने हाक 🙋🏻 मारली. तो मात्र तिच्याकडे पाहत तिथेच थांबला. तीच त्याच्याजवळ आली आणि हात पुढे करत हलकीशी स्माईल देत त्याला म्हणाली, "Congratulations". त्यानेही लगेच तीच्या हातात हात दिला. काहीही न बोलता तो तसाच तीच्या डोळ्यांत पाहत थांबला होता. "बाकी खेळतोस ही तू छान", ती पुढे म्हणाली. तो "Thank you" म्हणणार, इतक्यात शाळा सुटल्याची बेल वाजली आणि त्याच्या मित्रांनी त्याला पटकन ओढत तिथून ते घेऊन गेले. तीही गालातल्या गालात हसत तिथून निघून गेली.

तो घरी जाण्यासाठी इतरांसारखी काही गडबड करत नसायचा. १-२ एसटी गेल्यानंतर तो निवांत जायचा. पण ती मात्र पहिल्याच एसटीत जायची आणि गर्दीतूनही लवकर जाऊन तीच्या मैत्रीणींना जागा पकडायची. तीचं गाव लांब होतं आणि ती सातवीत असल्याने दोन वर्षांत तीला गर्दीची सवयही झाली होती. त्यादिवशी नेहमीप्रमाणे तो आणि त्याचे मित्र स्टँडवर इमलीच्या लहान पुड्या चघळत थांबले होते. 

खिडकीतून तीने त्याला आवाज दिला आणि "जागा पकडलीये, चढ लवकर", असं म्हणाली. तो तिच्याकडे एकटक पाहत तसाच उभा राहिला होता. त्याला कारण तीच्या चेहऱ्याचा गोरापान रंग, पातळ आणि धनुष्यकृती भुवया, लांब आणि टोकदार नाक, थोडेसे कुरळे आणि भोरे केस आणि या सर्वांच्या जोडीला तीच्या चेहऱ्यावर पसरलेला मावळणाऱ्या सूर्याचा तांबडा प्रकाश यांमुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. थोडक्यात तो भान हरपलाच होता. तितक्यात एसटी सुरू झाली आणि त्याचे मित्र म्हणाले, "ए यड्या .......च्या, चढ की लवकर. जागा पकडलीय की तीनं". एसटी निघण्याच्या अगोदर कसाबसा त्याने एसटीत प्रवेश मिळवला. तो तीच्या जवळ जाताच तीने दप्तर उचललं आणि आत सरकली. ती काही बोलणार, तितक्यात 
तोच म्हणाला; "Thank You". 
ती :- जागा पकडली म्हणून ?
तो :- नाही गं. मघाशी तू अभिनंदन केल्यानंतर      म्हणायचंच राहून गेलं.  
त्याचे दोन्ही मित्र त्यांच्या शेजारीच उभा राहिलेले होते. त्याचा एक मित्र दुसऱ्याला म्हणाला, "बघ अशी असतीय हुशार पोरांची हवा". बोलत बोलत त्याचं गाव कधी आलं, तेच दोघांच्याही लक्षात आलं नाही. इथं पुन्हा एकदा त्याचे मित्रच कामाला आले. "चला सर. उतरायचंय आपल्याला", असं त्याचे मित्र म्हणताच तो, ती आणि ते दोघे असे सगळेच हसायला लागले. तो एसटीतून उतरला. तीने टाटा केला आणि तीचा व एसटीचा त्या सोनेरी दिवसाच्या आठवणींसोबत पुढचा प्रवास सुरू झाला. 

भाग एक समाप्त. दुसरा आणि शेवटचा भाग दोन दिवसांनंतर. 

- प्रतिक दत्तलता होले

Thursday, 7 May 2020

असा साजरा केला मी महिला दिन

('आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची पोस्ट माझ्या फेसबुक अकाउंटला ८ मार्चला टाकलेली आहे. कोणाला वाचायची असल्यास तिथे जाऊन वाचू शकता किंवा मला मेसेज केला तर मी पाठवेन.)

प्रत्येकासाठी आपली आई खूप कष्ट करत असते आणि प्रेम करत असतेच. माझ्या आयुष्यात माझ्या आईशिवाय कोणतीही स्त्री शरीराने आणि मनानेही जवळ आलेली नाही. मी आज जो कोणी आहे आणि पुढे जो कोण होईल, ते फक्त माझ्या आईमुळेच. 

माझ्या आईचे आई-वडील शिक्षित नव्हते, त्यामुळे तिची नेमकी जन्मतारीख माहित नाही. त्यामुळे तीचा वाढदिवसही साजरा करता येत नाही. माझा भाऊ आणि माझ्याकडे पाहून ती दिवसभर राबत असते. मी महिला दिनी हॉस्टेलला होतो. प्रात्यक्षिक परीक्षेमुळे मला आई-वडील १० तारखेला असणाऱ्या धुलिवंदनासाठी मटन खायला बोलवत असूनही जाता आलं नाही. त्या रात्री महिला दिनाविषयी लिहायचं असल्याने मी रात्री लिहितच होतो. त्याचवेळी एक खूप छान कल्पना डोक्यात आली. तोपर्यंत सकाळ झालेलीच होती.

भैय्याला फोन केला आणि आईपासून लांब ये, असं सांगितलं. रात्री काय करायचं आहे, त्याची कल्पना त्याला दिली. योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आईला कळू द्यायचं नाही, हे सुद्धा आवर्जून सांगितलं. तसं दररोज आईला सकाळी एक कॉल (नाष्टा केला का विचारण्यासाठी आई कॉल करते) आणि रात्री एक कॉल, असं आमचं ठरलेलं असतं.

 त्यादिवशी मी फेसबुकला महिला दिनाच्या निमित्ताने लेख पाठवला आणि रात्रभर जागा असल्याने नाष्टा करून ७ वाजता फोन सायलेंट करून झोपी गेलो. १ वाजता उठलो तेव्हा आईचे २ मिस्ड कॉल्स पडले होते. तीच्याशी थोडं बोललो. अंघोळ केली आणि मेसमध्ये जेवायला गेलो. जेवण करून परत वर्तमानपत्र वाचत बसलो. संध्याकाळी चहा पिऊन खोलीवर आलो. रात्री नऊ वाजता भैय्याने कॉल केला आणि म्हणाला की, 'ऑनलाईन ये'.

मी भैय्याला काय सांगितलं होतं ? तर मी त्याला म्हणालो होतो, स्वीट होममधून गुलाबजाम घेऊन ये. तुझे पैसे खर्च कर, मी स्कॉलरशिप आली की तुला पाठवतो. माझ्या आईला पाकातले गुलाबजाम फार आवडतात. मी व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला, नेहमीप्रमाणे अगोदर जेवला का ? वगैरे विचारलं. भैय्या गुलाबजाम घेऊन आला आणि आईला सांगितलं, "तुझा वाढदिवस कधी असतो, ते माहित नाही. म्हणून महिला दिनाला तुला खूष करायचं होतं." भैय्याने एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने आईला गुलाबजाम चारलं. आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती दरवेळी फक्त माझी पप्पी घेत असते, पण त्याक्षणी तीने भैय्याची खूप दिवसांतून पप्पी घेतली. नंतर तीने वडीलांना आणि भैय्यालाही गुलाबजाम चारलं. हे सगळं दृश्य लाईव्ह पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आलं नसतं, तरच नवल !!!😫😅  मी कॉल कट केला. (तीला घरी असताना चिकटून झोपायचो. म्हणून तीची आठवण येऊ नये, यासाठी तीच्याच जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी माझ्याबरोबर घेऊन गेलोय.) गोधडी चेहऱ्यावर घेऊन मनमोकळेपणाने रडत बसलो. अर्थात ते आनंदाश्रू होते, हे वेगळं सांगायला नकोच. 

(हा फोटो बांग्लादेशची राजधानी ढाका शहरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रीचा आणि तीच्या भविष्याचा आहे. स्त्रोत - गुगल)

थोड्या वेळाने तात्या (माझा ज्युनिअर आणि रूममेट) आला आणि म्हणाला, चल चहा प्यायला. वातावरणात थोडीशी थंडी होतीच. त्याला सगळा प्रसंग सांगत चहा प्यायला निघालो. शेवटी तोही रडायला लागला... दोघेही आईपासून दूर होतो, पण दोघांमध्ये आई दूर असण्याच्या अंतराचा फरक होता. माझी आई ३-४ तासांच्या अंतरावर होती. त्याच्या आईची दूरी मोजायला आतापर्यंत तरी कोणतंच परिमाण नाही. कारण दुसरीत असतानाच त्याची आई वारली होती...

- प्रतिक दत्तलता होले

Monday, 4 May 2020

लग्नाअगोदर मैत्री असणं महत्वाचं...

ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही लग्न करणार आहात. आपलं उर्वरित संपूर्ण आयुष्य सोबत घालवणार आहात. त्याच्याशी अगोदर चांगली मैत्री करा, एकमेकांना समजून घ्या. - आचार्य चाणक्य

लग्न म्हणजे फक्त सगळे करतात म्हणून वय झाल्यानंतर करण्याची एक गोष्ट नसून ती खूप महत्वाची जबाबदारी आहे, हे मुलगा-मुलगी दोघांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. लग्नानंतर संसार नावाचं पर्व सुरू होतं. त्या संसारामध्ये दोघांच्या भविष्याची सोनेरी स्वप्ने, होणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य अशा जबाबदाऱ्या, आई-वडील अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

संसार म्हणजे सायकल असते, असं म्हटलं जातं. त्यातील नवरा व बायको यांचे नाते पेडल (pedal) व चेन (chain) यांच्यासारखे असते. पेडल मारल्याशिवाय चेन फिरत नाही आणि चेन पडली तर नुसतं पेडल मारून काही सायकल पळत नाही. दोघांनाही एकमेकांना साथ दिल्याशिवाय काम करता येत नाही; मग ती सायकल असो नाहीतर संसार.

आपल्या समाजात लग्न जमवण्याची पद्धतच मुळात खूप विचित्र आणि भयंकर होती आणि आहे. आपल्या आई-वडील आणि आजी-आजोबांच्या वेळी तर मुलगा आणि मुलीला विचारत सुद्धा नसायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जन्म झाल्यावर लगेचच एकमेकांना वचन पण देऊन टाकायचे. हे वरकरणी जरी गंमतीशीर वाटत असलं तरी खूप भयंकर आणि नुकसानकारक आहे. आपल्या आजीला विचारा की, तरूणपणी आजोबा आजीला किती शिवीगाळ, मारहाण करायचे ते. 

आता लग्नाच्या वेळी मुलाचं वय वर्षे साधारण २५ ते २७ आणि मुलीचं २० ते २३ च्या दरम्यान असतं. म्हणजे ६० वर्षे आयुर्मान धरलं तरी पुढची ३५-४० वर्ष दोघांना बरोबर घालवायची असतात. मग अगोदर नाव सुद्धा माहित नसलेल्या व्यक्तीबरोबर फक्त बाह्यरूप आणि आर्थिक परिस्थिती पाहून इतकी वर्ष सोबत कशी घालवणार ? आर्थिक परिस्थिती गरजेची आहेच, नाही असं नाही. पण फक्त आर्थिक परिस्थितीमुळे व्यवस्थित संसार नाही करता येत. जे मुलं-मुली बाहेर हॉस्टेलला राहतात, त्यांना हे व्यवस्थित समजेल. जर एका खोलीमध्ये राहणाऱ्यांचे विचार, स्वभाव पटत नसेल तर रहायला किती अवघड होतं. तिथे तर फक्त काही महिने किंवा वर्षे रहायचं असतं, त्यांच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायचं नसतं. मग विचार करा की, ज्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, आवड-निवड माहित नसेल त्याच्याबरोबर इतकी वर्षे कसं राहणार ?

 मला माहित आहे की, प्रत्येकाचे आपल्या आई-वडीलांवर प्रेम असते. त्यामुळे त्यांना दुखावून नाही चालणार. पण ते घेतील तो निर्णय बरोबरच असेल, याची खात्री कशावरून ? त्यांना खूप अनुभव असतो. पण प्रत्येकवेळी अनुभवच उपयोगी पडत नाही. महत्वाचं म्हणजे, तेही चुकू शकतातच की ? लग्न म्हणजे खूप मोठा निर्णय आहे, तो चुकल्यानंतर परत निभावता येत नाही. कारण अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडे पटत नसेल तर परस्परसंमतीने घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करता येत नाही. जर नवरा-बायको यांचे संबंध बरोबर नसतील तर ओढूनताणून ते नातं टिकवण्यात काय अर्थ आहे ?

मी अशी कितीतरी जोडपी पाहिलीत की, ज्यांचा एकमेकांवर कसलाच विश्वास आणि परस्परांमध्ये संवाद नसतो. नवरा-बायको दोघेही आपापल्या मनाप्रमाणे वागत असतात. मग ना त्यांना संसार व्यवस्थित करता येतो, ना त्यांची मुलं व्यवस्थित नोकरी-धंदा करत असतात. नवरा-बायको यांच्या संबंधाचा परिणाम आपोआप मुलांवरही पडत असतो. मग ती मुलं वाईट मार्गाला लागतात, हे वेगळं सांगायला नकोच. याउलट मी अशीही कितीतरी जोडपी पाहिलीत की, जे एकमेकांना विश्वासात घेऊन वाटचाल करत असतात. सुरूवातीला त्यांच्याजवळ काहीही नसताना आता ते सर्व भौतिक सुखसोयींनी समृद्ध आहेत. त्यांची मुलंही साहजिकच परस्पर संवादामुळे सगळं आई-वडीलांना विश्वासात घेऊन करत असतात आणि यशस्वी सुद्धा होतात. 

आता प्रश्न हा उभा राहतो की, हे सगळं तर खरं आहे. पण आई-वडीलांना कसं समजावायचं ? त्यासाठी सर्वांत महत्वाचं म्हणजे, मुलगा-मुलगी दोघांनाही पूर्णपणे आर्थिक स्वावलंबी व्हावं लागेल. जर तुमचं एकमेकांवर प्रेम असेल तर कुटुंबियांना विश्वासात घेऊन ते व्यवस्थित समजावून सांगा. जात-धर्म, कुळ, गोत्र या सगळ्या मानवनिर्मीत गोष्टी आहेत, हे त्यांना सांगावं लागेल. तेव्हाच घरच्यांना तुमच्यावर विश्वास येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जर अरेंज पद्धतीने लग्न करायचं असेल तर लग्नाअगोदर काहीवेळ (ज्याला लीव्ह इन म्हणतात) एकत्र घालवा. एकमेकांचे विचार, स्वभाव जाणून घ्या. जर पटत असेल तर ठीक नाहीतर कुटुंबियांना तसं स्पष्ट सांगा. जर असं झालं नाही तर मग मात्र पुढची वाटचाल खूप कठीण आहे. 

लग्न जमवताना कुंडलीतील ३६ गुण जुळताहेत का ? हे पाहण्याऐवजी ३६ प्रश्न तयार करून एकमेकांच्या आवडी-निवडी, विचार, स्वभाव जुळताहेत का ? हे पाहणं खूप महत्वाचं आहे, असं मला वाटतं. उदाहरण म्हणून सांगतो, माझे एक मार्गदर्शक मित्र आहेत. त्यांचे एका मुलीवर प्रेम होते. ५वी ते १०वी ते एका वर्गात होते आणि दहावीपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. ते दोघेही सध्या STI आहेत आणि MPSC ची पूर्व, मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखत दिलेली आहे. निकाल अजून यायचाय, पण त्याअगोदर दोघांनी आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन लग्नाला होकार मिळवला आहे. 

(एकमेकांचा हातात हात घेऊन, एकमेकांना सावरत, प्रेमाची साथ देऊन असंच चालता आलं तर रस्त्यात कितीही काटे, खड्डे, दगड असतील तरीही खडतर प्रवास करून सुखाच्या सागराला जाऊन मिळता येईल.)

शेवटी एवढंच सांगतो की, जर नवरा-बायको दोघांची एकमेकांना साथ असेल तर वाळवंटातही हिरवं शिवार फुलवता येतं. याउलट जर दोघे एकत्र नसतील तर हिरव्या शिवाराचं वाळवंट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही.

- प्रतिक दत्तलता होले

Sunday, 26 April 2020

भारताचे भाग्यविधाते - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारताचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असं आपण ज्यावेळी म्हणतो तेव्हा बाबासाहेबांची जी फक्त दलितांचा उद्धारकर्ता अशी प्रतिमा रंगवली जाते, ती चुकीची आहे हे लक्षात येते. हे खरं आहे की, दलितांच्या उद्धाराशिवाय भारत देशाला खऱ्या अर्थाने आकार प्राप्त होणार नाही किंवा त्यावेळच्या ६ कोटी असणाऱ्या दलित समाजाला भारताच्या विकासात सामावून घेतल्याशिवाय भारत देशाचाही विकास परिपूर्ण होणार नाही; म्हणूनच बाबासाहेबांनी पिढ्यानपिढ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाजाच्या उद्धारासाठी अहोरात्र झटून त्यांना न्याय मिळवून दिला. बाबासाहेब हे दलितांचे नेते होतेच, नाही असं नाही. पण फक्त दलितांचे नेते कधीच नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे, दूरदृष्टीचे नेते म्हणजेच भारताचे भाग्यविधाते होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शेतकरी, कामगार, स्रिया, आर्थिकदृष्ट्या मागास, विद्यार्थी, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक या सर्वांचे नेते म्हणजेच भारताचे भाग्यविधाते होते.


बाबासाहेबांच्या कार्यांतील कळसोध्याय म्हणजे संविधान निर्मितीचं काम. अत्यंत विपरीत परिस्थितीतही भारत देश अखंड ठेवण्यासाठी, मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या उत्कर्षासाठी जगातील सर्वांत सुंदर दस्तऐवज म्हणजे 'भारतीय संविधान'निर्माण करणं आणि घटना समितीच्या सदस्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन प्रत्येक कलम समजावून सांगणं म्हणजे अर्थातच भारताच्या भविष्यासाठी केलेला तो ज्ञानयज्ञच होता.

जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, पेहराव अशा कोणत्याही घटकांवर भेद न करता सर्वांना समान दर्जा व मुलभूत अधिकार; सर्वांना आपला सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली दर्जाची व संधीची समानता; सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय; व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारं संविधान निर्मितीचं काम यामुळेच बाबासाहेब खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतात आणि जगातही मान्यता पावले. 

सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर संविधानामुळे सर्व भारतीयांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या. मनुस्मृतीने अस्पृश्य, ओबीसी आणि आदिवासी समाजाच्या प्रगतीत आडकाठी आणली होती. विद्यार्थ्यांना शाळा आणि विद्यालयांत मिळणारा माध्यान्ह पोषण आहार, आठवीपर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण, उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती, जात-पात न पाहता कोणताही अभ्यासक्रम शिकण्याची संधी, मुलींना मोफत शिक्षण तसेच प्रवासाचा बसपास, रेशनचे धान्य, घरकुल आणि शौचालय अनुदान असे असंख्य फायदे संविधानामुळे त्यातील कायद्यांद्वारे भारतीयांना मिळाले. पाच लाखांपर्यंतचे तसेच शेतीवरील उत्पन्न करमुक्त आहे. तिथून पुढील उत्पन्नावर (जेवढे जास्त उत्पन्न तेवढा जास्त कर) कर लावून तो पैसा गरीबांच्या कल्याणासाठी वापरला जातो. राजेशाही मध्ये वडिलांचा जो व्यवसाय किंवा नोकरी असेल, तीच त्याच्या मुलालाही करावी लागायची. मात्र संविधानामुळे वडील मजूर, हमाल जरी असले तरी आपल्या कर्तृत्वावर आपल्याला तुम्हाला तुमचा उत्कर्ष करण्याची संधी मिळाली. अगदी मोठमोठ्या पदांवर म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान, प्रशासकीय अधिकारी, न्यायाधीश अशा कित्येक पदांवर गरीब, दलित, महिला, अल्पसंख्यांक पोहोचू शकले; ते भारतीय संविधानामुळेच.

२७ जानेवारी १९४९ रोजी साऊथबरो आयोगासमोर आपली साक्ष नोंदवताना बाबासाहेबांनी सर्वप्रथम सर्वच भारतीयांसाठी प्रौढ मताधिकाराची मागणी केली. सायमन आयोग आणि गोलमेज परिषदेत त्यांनी ही मागणी लावून धरली. पुढे भारतीय संविधानात 'कलम 326' अंतर्गत 18 वर्ष पुर्ण केलेल्या भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला.अमेरिकेसारख्या देशातही महिलांना मताधिकारासाठी मोठा लढा द्यावा लागला होता.सौदी अरेबियात मागच्या 4-5 वर्षात महिलांना हा अधिकार मिळाला.पण 10 वर्षांपूर्वी साउथबरो आयोगासमोर सर्व भारतीयांच्या प्रौढ मताधिकाराची मागणी कोणताही भेदभाव न करता करणारे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे खरे दृष्टे नेते,भारताचे भाग्यविधाते होते.

         भारताचे भाग्यविधाते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर असे म्हणताना शेतकरी नेतेही त्यांची झाकोळती गेलेली प्रतिमा लक्षात घेणं महत्वाचं आहे.बाबासाहेबांनी 1929 साली पहिली शेतकरी परिषद घेतली.त्यांनी विधिमंडळावर काढलेला पहिला मोर्चा दलितांचा नाही तर शेतकर्यांचा होता.कसणार्यांना जमिन मिळावी म्हणून त्यांनी 1932 मध्ये 'खोती' रद्द करण्याचे विधेयक लिहिले.1936-38 ला सर्व ताकदिनिशी मुंबई विधिमंडळात ते मंजूर व्हावे म्हणून लढा दिला.सुमारे 102 वर्षांपूर्वी 1918 साली त्यांनी शेतकर्यांच्या व्यथा, त्यांच्या पुढच्या शेती समस्या मांडणारं 'स्माॅल होल्डींग्ज इन इंडिया अॅड देअर रेमेडीज' हे पुस्तक लिहिलं होतं.शेतीवरील ओझं कमी करा, एकच मूल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नि उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला. शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा.शेतकरी सुखी तर देश सुखी.हे उपाय जर तातडीने केले नाहीत तर शेतकरी डेंजर झोनमध्ये येईल,असं भाकीत त्यांनी शंभर वर्षांपूर्वी केलं होतं.एक प्रकारे त्यांनी शेतकरी आत्महत्यांचा इशाराच दिला होता. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाल्यावर उद्योगांप्रमाणे शेतीलाही 24 तास आणि 365 दिवस वीज आणि पाणी मिळेल,असं ते म्हणत होते.शेती आधुनिक पद्धतीनं तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करायला हवी.शेतीला जोडधंदे, पुरक उद्योग म्हणजेच दुग्धोत्पादन, अंडी-लोकर उत्पादन यांची जोड द्यायला हवी.कारण त्याकाळी 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून होते.ज्याची टक्केवारी आता जवळपास 60 टक्के आहे.

      'जलतज्ञ' डाॅ.आंबेडकर ही बाबासाहेबांची प्रतिमा तर कोणाच्याच समोर नसते.20 जुलै 1942 रोजी ते ब्रिटिश सरकारच्या मंत्रिमंडळात कामगार,सार्वजनिक बांधकाम,ऊर्जा आणि पाटबंधारे खात्यांचे मंत्री झाले.त्याच पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी देशातील पंधरा धरणांच्या कामाची सुरुवात केली.त्यांच्या काळात उभा राहिलेले हिराकूड हे धरण जगातले तेव्हाचे सर्वात लांबीचे धरण होते.त्यांना पाच कारणांसाठी पाणी महत्वाचं वाटत होतं. पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंदे, जलप्रवास आणि जलपर्यटन. देशातील मोठ्या नद्या एकमेकींना जोडून त्यांच्यातून रेल्वेच्या  जाळ्याप्रमाणे कालव्यांचे जाळे तयार करायचे होते.कारण जलप्रवास हा अत्यंत स्वस्त समजला जातो.शिवाय विरंगुळ्यासाठी त्या पाण्यावर उद्यानं तयार करून जलपर्यटनासाठी प्रोत्साहन द्यायचं होतं.वाढत्या लोकसंख्येसाठी लागणारी पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी त्यांनी जलसाक्षरता मोहीमच लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

      ओबीसी या प्रवर्गासाठी बाबासाहेबांनी केलेलं कार्यही दुर्रलक्षितच राहिलं आहे.बाबासाहेबांनी मुंबई प्रांताचे आमदार असताना ओ.बी.एच.स्टार्ट कमिटीचे सदस्य म्हणून 1930 साली सर्वप्रथम ओबीसी प्रवर्गालाही कायदेशीर मान्यता व संरक्षण दिले जाण्याची शिफारस केली होती.शिक्षण,सामाजिक प्रतिष्ठा,संपत्ती,सत्ता आणि मानवी अधिकार यांपासून ओबीसी वंचित होते.राज्यघटनेत 340 व्या कलमाच्या निर्मितीद्वारे त्यांनी ह्या घटकाला हक्क मिळवून दिले.'हू वेअर द शुद्राज'या पुस्तकाद्वारे त्यांनी सर्वप्रथम 1946 साली स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केलेली होती.लोकसंख्येचे प्रमाण लक्षात आल्या शिवाय अर्थसंकल्पात त्यांना त्याप्रमाणात तरतूद करता येत नाही.

        वाढत्या लोकसंख्येसाठी आणि शेती,उद्योगांसाठी लागणारी वीजेची गरज भागवण्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारमध्ये ऊर्जामंत्री असताना मोठमोठे वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतले होते.

        कामगारांसाठी मजूरमंत्री असताना कामाची आठ तासांची मर्यादा,किमान वेतन निश्चिती,पगारी रजा,ज्यादा कामाचे तासाप्रमाणे दुप्पट वेतन,आरोग्य विमा,कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना,सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरांची उपलब्धता असे अनेक फायदे त्यांनी कामगारांना मिळवून दिले.

बाबासाहेबाची दूरदृष्टी किती होती, हे त्यांनी मुंबई विधिमंडळात १० नोव्हेंबर १९३८ ला कुटुंब नियोजनासाठी मांडलेल्या अशासकीय विधेयकावरून लक्षात येते. त्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, "जन्मदर महत्वाचा नसून पोषण दर महत्वाचा असतो. लोकसंख्येचा वाढणारा भस्मासुर देशाला परवडणारा नसून भारतीयांनी 1-2 अपत्यांवर थांबले पाहिजे आणि मुलामुलींचे उत्तम पालनपोषण केलं पाहिजे. मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, त्यांच्यासाठी पालेभाज्या आणि कडधान्यांची व्यवस्था, आरोग्य, रोजगार यांची सोय करता यायला हवी. छोटे कुटुंब असणारांना पुरस्कार आणि सवलती द्याव्या. तर जास्त मुले जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगवासाची शिक्षा करावी." पण सर्वच पक्षांनी हे विधेयक फेटाळले. बाबासाहेबानी लगेच १० डिसेंबरला मुंबईत युवक परिषत घेऊन एकाच अपत्यावर थांबण्याचा सल्ला युवकांना दिला. १९५२ सालच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी कुटुंब नियोजनाचे वचन दिले होते.

एखाद्या देशाची प्रगती मोजायची असेल तर ती त्या देशातील स्त्रियांची किती प्रगती झालेली असेल त्यावरून मोजावी, असे बाबासाहेब म्हणतात. राजकारणात व पक्षसंघटनेत स्त्रियांना अग्रक्रम दिला पाहिजे. स्त्रियांनी पतीला सांगावे की, ती त्याची मैत्रीण आहे, बरोबरीची आहे आणि गुलाम नाही. हिंदू कोड बिलामध्ये स्रियांनाही वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार, घटस्फोट कायदा ही तरतूद होती. मात्र हे बील मंजूर न केल्याने त्यांनी नेहरूंच्या मंत्रीमंडळातून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. स्रियांनाही पुरूषांप्रमाणे समान कामासाठी समान वेतन, मातृत्व रजा बाबासाहेबांनी मिळवून दिले.

शिक्षणक्षेत्रातही त्यांनी भरीव कार्य केले. अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सोलापूर, पुणे, औरंगाबाद याठिकाणी वसतिगृहे सुरू केली. अनुसूचीत जातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, म्हणून 'पिपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना करून सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले. 

पिढ्यानपिढ्या मागास राहिलेल्या अस्पृश्य समाजाला सामाजिक स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी महाडचे चवदार तळे सत्याग्रह, नाशिकचे काळाराम मंदिर सत्याग्रह, बहिष्कृत भारत, जनता यांतून समाजप्रबोधन केले. राजकीय सुधारणा आणि हक्कांची मागणी करून संविधानात ते मिळवूनही दिले. सामाजिक न्यायासाठी प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि पंचायत राज ते संसद येथे राजकीय आरक्षण मिळवून दिले. 

जातीनिर्मूलनासाठी त्यांनी स्री-पुरूष समता, सर्वांना शिक्षण, संसाधनांचे फेरवाटप, आंतरजातीय विवाह आणि धर्म चिकित्सा ही पंचसूत्री दिली. १९५६ साली त्यांनी बौद्ध धर्म स्विकारून समतेचा पुरस्कर्ता असलेल्या बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे ठरवले होते.

भारतीय संविधानाची सुरूवात देवाच्या नावानं करावी, असे घटना समितीतील काही सदस्य म्हणत होते. बाबासाहेबांनी 'आम्ही भारताचे लोक' या शब्दांनी सुरूवात व्हायला हवी, असे सुचविले. भारताच्या राज्यघटनेत काळानुरूप दुरूस्त्या करण्याची व्यवस्था आहे. मात्र अशी दुरूस्ती करताना राज्यघटनेच्या मूळ चौकटीला हात लावता येणार नाही, अशी व्यवस्था त्यांनी करून ठेवल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती निकालात तसे स्पष्ट आदेशच दिले. भारतातील लोकशाही नष्ट करून तिथे कधीही हुकूमशाही, राजेशाही अथवा लष्करशाही आणता येऊ शकत नाही; ही बाबासाहेबांची भारताला देण आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय जीवनाची चर्चा करताना ती दोन पातळींवर करावी लागते. एका पातळीवर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कांसाठी केलेलो राजकारण आणि दुसऱ्या पातळीवर सर्वच भारतीयांसाठी आणि अंतिमतः मनुष्यजातीच्या मुक्तीसाठी केलेले योगदान समजावून घ्यावे लागते. 

काही वर्षांमध्ये 'भारताचे भाग्यविधाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर' ही प्रतिमा निर्माण करणं शक्य आहे. मात्र त्यासाठी बौद्ध, आंबेडकरवादी नेत्यांनी जाणीवपूर्वक बॅकसीट घेऊन बाबासाहेब हे ओबीसी, महिला, शेतकऱ्यांचे नेते होते; ही प्रतिमा रूजवण्यासाठी त्या समूहातील अभ्यासक, नेते, प्रचारक, प्रसारक यांना बळ द्यायला हवे. त्यांना समाजात पुढे करायला हवे.

संदर्भ- १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र - धनंजय कीर
२) प्रा. हरी नरके लेखमाला
३) माझे अगोदरचे ब्लॉग

- प्रतिक दत्तलता होले

Monday, 13 April 2020

मला समजलेले बाबासाहेब

२८ नोव्हेंबर १८९० ला एक महात्मा काळाच्या पडद्याआड गेला. पण साडेचार महिन्यांतच दुसऱ्या महामानवाचा अनिष्ठ जातीपातींच्या रूढी तोडायला उदय झाला. त्यांची प्रत्यक्ष भेट घडली नाही, मात्र त्यांच्या कार्याने त्यांना एकत्र आणलं. त्यांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर.

एखादा प्रियकर जेवढं त्याच्या प्रेयसीवर प्रेम करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम बाबासाहेबांनी पुस्तकांवर केलं. शहाजहानने त्याच्या प्रेयसीसाठी ताजमहाल बांधला, बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकांसाठी राजगृह बांधलं. त्यांना ज्ञानाच्या भूकेमुळे पोटाची भूक दिसत नव्हती. मी तुम्हाला आवाहन करतो, की एकदा या असामान्य कर्तृत्वाला वाचा. मी खात्रीशीर सांगतो, तुमची ज्ञानाची भूक वाढल्याशिवाय राहणार नाही. कंटाळा, आळस, निराशा तुम्हाला कधीच गाठणार नाही. 

जे म्हणतात की, त्यासाठी पहिल्यापासूनच अभ्यासाची गोडी लागते. त्यांना बाबासाहेबांच्याच आयुष्यातील एक प्रसंग सांगतो. बाबासाहेब लहान असताना अभ्यासात त्यांचं मन रमत नव्हतं. तेव्हा त्यांनी घरच्या परिस्थितीला हातभार लागावा, म्हणून मुंबईला कापड गिरणी मध्ये कामाला जायचं ठरवलं. त्यावेळी ते साताऱ्याला राहत होते. कामाला मुंबईला जाण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईने साठवून ठेवलेलं पैसे चोरण्याचंं ठरवलं. ते चोरलेही, पण मुंबईला जाण्यापुरते ते पैसे पुरेसे नव्हते. मग त्यानंतर मात्र त्यांनी ज्ञानप्राप्तीचा असा वेग पकडला की त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या तुम्हां-आम्हांसारख्या कोट्यवधी लोकांचा आपल्या ज्ञानप्रकाशाने उद्धार केला. 
(स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधानाची प्रत अर्पण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मागे पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद.)

बाबासाहेबांच्या कार्यांतील कळसोध्याय म्हणजे, संविधान निर्मितीचं काम. पायाच्या स्नायूंच्या प्रचंड वेदना, डोळे म्हणजेच दृष्टी कमी झालेली, घटना समितीच्या सात सदस्यांपैकी फक्त एकट्यावरच पडलेला कामाचा भार अशा विपरीत परिस्थितीतही भारत देश अखंड ठेवण्यासाठी, मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, तळागाळातील लोकांच्या उत्कर्षासाठी जगातील सर्वांत सुंदर पुस्तक म्हणजे भारतीय संविधान निर्माण करणं आणि घटना समितीच्या सदस्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन प्रत्येक कलम समजावून सांगणं म्हणजे अर्थातच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला तो ज्ञानयज्ञच होता. हे करत असताना ते अधूनमधून मुंबईला येऊन उपचार घेत असत. जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, पेहराव अशा कोणत्याही घटकांवर भेद न करता सर्वांना समान दर्जा व मुलभूत अधिकार; सर्वांना आपला सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली दर्जाची व संधीची समानता; सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय; व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारं संविधान निर्मितीचं काम यामुळेच बाबासाहेब खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतात आणि जगातही मान्यता पावले.


(स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून शपथ घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

मजूरमंत्री असताना कामगारांसाठी कामाची आठ तासांची मर्यादा, किमान वेतन निश्चिती, पगारी रजा, ज्यादा कामाचे तासाप्रमाणे दुप्पट वेतन, आरोग्य विमा, कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरांची उपलब्धता असे अनेक फायदे त्यांनी कामगारांना मिळवून दिले. स्रियांनाही पुरूषांप्रमाणे समान वेतन, मातृत्व रजा, घटस्फोट कायदा, वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले. सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा अमेरिकेतही नव्हता आणि आजही कित्येक देशांत नाही, तेव्हा स्रियांना अमूल्य असा मतदानाचा हक्क दिला.

कोणत्याही महापुरूषांना मानण्यासाठी त्यांच्या जातीचं नाही, तर त्यांच्या विचारांचं असावं लागतं. ज्या देव-धर्माने दलितांना मंदिरात जाण्यासाठी बंदी केली होती म्हणजेच देव-धर्माने रूढी-परंपरांच्या नावाखाली समाजाला विभागण्याचं काम केलं होतं आणि त्या विभागलेल्या समाजाला बाबासाहेब, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकत्र आणण्याचं काम केलं होतं. पण आज बहुसंख्य समाज देव-धर्माच्या नावाखाली एकत्र येतोय आणि महापुरूषांचे अनुयायी (सर्व नाही) विभागले गेलेत. 

या भीमजयंतीला आपण सर्वांनी संविधान समजून घेण्याचा, आपल्यामध्ये रूजवण्याचा, इतर लोकांना समजून सांगण्याचा, जनजागृती करण्याचा संकल्प करूया. तीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.

(आमचे ५-६ वीचे कला शिक्षक अतुल गायकवाड सर यांनी कलर पेन्सिलचा वापर करून काढलेले बाबासाहेबांचे व्यक्तीचित्र)

ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन.

- प्रतिक दत्तलता होले


Friday, 10 April 2020

अपरिचीत महात्मा फुले


उद्या महात्मा फुले यांची जयंती. [ज्यांनी मी पाठविलेला "महात्मा फुले यांच्या जन्मतारखेचा शोध" हा प्रा. हरी नरके यांचा लेख वाचला नसेल, त्यांना महात्मा फुले यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण जर जन्मतारखेचा शोधच लावला नसता, तर तुम्ही जयंती कशी साजरी करणार ???]

१) १८७६ ते १८८२ या काळात महात्मा फुले पुण्याचे आयुक्त (कमिशनर) होते.
२) महाराष्ट्रामध्ये जातीभेद निर्मूलनाचं काम पहिल्यांदा महात्मा फुले यांनी केलं होतं.
३) महात्मा फुले यांनी अत्यंत उत्कृष्ट असे रस्ते, कालवे, तळी, पूल, बोगदे त्यांच्या 'पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी' मार्फत बांधले. ज्यात पुणे-सातारा महामार्गावरील कात्रजचा बोगदा, खडकावासला धरणाचे कालवे, आताची महात्मा फुले मंडई, येरवड्याचा बंडगार्डनचा पूल यांचा समावेश होतो.
४) जातीभेद निर्मूलनासाठी आपल्या घरातील विहीर अस्पृश्यांना पाणी पिण्यासाठी खुली केली.
५) त्याकाळी ब्राह्मण समाजात मुलींचं विवाहाचं वय कमी आणि मुलांचं खूपच जास्त असायचं. कधीकधी आजारपणामुळे मुलाचा लवकर मृत्यू व्हायचा. मग त्या मुलीला अगदी तरूणपणापासूनच म्हातारपणापर्यंत एकटीला जीवन घालवावं लागायचं. ज्यामुळे तीची शारीरिक भूक मरून जायची. म्हणून त्यांनी ब्राह्मण विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला.
६) महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्वतःला मूल नव्हतं. म्हणून मग त्यांनी एका ब्राह्मण विधवेचं मूल (यशवंत) दत्तक घेतले. त्याला शिक्षण देऊन डॉक्टर बनविलं आणि त्याचे आंतरजातीय लग्न लावून दिलं.
७) शिवरायांचं पहिलं मराठी पुस्तक महात्मा फुले यांनी १८६९ साली लिहून प्रकाशित केलं. १८८० साली रायगडावर शिवरायांची समाधी शोधून सर्वांत पहिल्यांदा पुण्यामध्ये त्यांनीच स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजातर्फे शिवजयंती साजरी केली.
८) सर्वांत महत्वाचं म्हणजे 'देव' ही संकल्पनाच महात्मा फुले यांनी पूर्णपणे नाकारली होती.

महात्मा फुले यांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली -
का ??? तर ज्या महात्मा फुले यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य जातीभेद निर्मूलनासाठी व्यतीत केले, आज त्याच बहुजन विशेषतः माळी समाजातील लोकच जातीला प्रमाणाबाहेर चिकटून बसले आहेत. ज्या महात्मा फुले यांनी स्वतःच्या दत्तक मुलाचं आंतरजातीय लग्न लावून दिले, पण आज त्यांच्याच समाजातील लोक जातीच्या बाहेर लग्न करायला तयार नाहीत. ब्राह्मण समाजाने तयार केलेली जातीची उतरंड ते घट्टपणे पकडून बसले आहेत. माळी समाजातील लोक मांग, महार, चांभार यांना खालचं समजतात. चांभार समाजाची लोक मांग, महार यांना खालचं समजतात. मांग महारांना खालचं समजतात. ही वास्तविकता आहे. यावर भर म्हणजे बाबासाहेब स्वतः म्हणाले होते की, जे लोक सुधारणांचा उपयोग घेऊन श्रीमंत झालेत, तेच आता अस्पृश्यांतील नवीन ब्राह्मण झालेत. धनगर जर असतील तर ते त्यामध्ये पण हटकर, शेगर या त्यांच्यातले त्यांच्यातच विवाह करतात. मराठा ९६ कुळी, ९२ कुळी या त्यांच्या समाजातच विवाह करतात. म्हणजे पहिलं धर्म, त्यानंतर जात, परत पोटजात, परत गरीब-श्रीमंत इतकं समाजाचं विभाजन झालंय.

दुसरं म्हणजे, देव ही संकल्पनाच महात्मा फुले यांनी पूर्णपणे नाकारली होती. कारण त्यांचे असे मत होते की, देव-धर्माच्या नावाखाली ब्राह्मण समाज बहुजन समाजाचं शोषण करतो. म्हणून तर त्यांनी 'सत्यशोधक' समाजाची स्थापना केली. पण आज अशी किती कुटुंब सापडतील बहुजन आणि माळी समाजात ज्यांच्या घरात देव-देवता नाहीत ? उलट सर्वांत जास्त देव-धर्म आणि कर्मकांड (जागरण, गोंधळ, जत्रा) यांत माळी समाज गुरफटलेला आहे. पण एक नम्रपणे सांगू इच्छितो की, जर तुम्ही महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना आणि देव-देवतांना एकत्र घरामध्ये ठेवत असाल, पूजत असाल तर तो त्या महापुरूषांचा खूप मोठा अपमान आहे. महत्वाचं म्हणजे, तुम्हाला त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही.

महात्मा फुलेंना आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत असतांना जातीजातींत आणि आर्थिक विषमतेत विभागलेल्या समाजाला मानसिक गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी किमान आम्ही गुलाम आहोत याचे भान आले तरी पुष्कळ झाले.

- प्रतिक दत्तलता होले

Tuesday, 7 April 2020

स्वातंत्र्य, लोकशाही आणि त्यांचे भवितव्य

[ज्यांनी माझा डॉ. ली वेनलियांग आणि लोकशाहीची आवश्यकता हा लेख वाचला नाही, त्यांनी अगोदर तो वाचा. म्हणजे या लेखाची गरज लक्षात येईल. माझ्या फेसबुक अकाउंटला २३ मार्च २०२० ला मी तो टाकलेला आहे.] 

तुम्हाला एखाद्या नेत्याची किंवा व्यक्तीची कार्यपद्धती, त्याचे कार्य आवडत असेल; तर त्याच्या एखाद्या निर्णयाला समर्थन देणं ठीक आहे. पण सरसकटपणे त्याच्या प्रत्येक निर्णयाला समर्थन देणं, हे चुकीचं आहे. त्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेलं एक भाषण आहे, ते सांगून ब्लॉगला सुरूवात करूया. स्वातंत्र्याला दुसरा धोका लोकांच्या व्यक्तीपूजेतून निर्माण झाला आहे, असे सांगून त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याच्या मताची सभागृहाला आठवण करून दिली. त्याने लोकशाहीच्या संरक्षकांस असा इशारा दिला आहे की; No person, however great, is greater than the country. एखादा माणूस कितीही महान असला तरी त्याच्या चरणावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये किंवा आपल्या संस्थेचा नाश करण्यास तो समर्थ होईल, एवढी मोठी सत्ता त्याच्या स्वाधीन करू नये. देशात प्रचलित असणाऱ्या आंधळ्या आणि निर्बुद्ध व्यक्तीूजेविरूद्ध इशारा देताना बाबासाहेब म्हटले की, "ज्या महान लोकांनी आयुष्यभर देशाची सेवा केली, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही. परंतु त्या कृतज्ञतेस काही मर्यादा असते. आयरिश देशभक्त ओकानेल याने म्हटल्याप्रमाणे, आपल्या आत्मप्रतिष्ठेचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही; आपल्या शीलाचा (शरीरसंबंध ठेवणे) बळी देऊन कोणीही स्री कृतज्ञ राहू शकत नाही आणि आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही. दुसऱ्या कोणत्याही देशांपेक्षा भारतात सावधगिरी बाळगायला हवी. कारण भारतामध्ये राजकारणात व्यक्तीपूजेचा इतका जबरदस्त परिणाम होतो की, तसा परिणाम जगातील कोणत्याही दुसऱ्या देशाच्या राजकारणात होत नाही. धर्मामध्ये भक्ती ही आत्म्याला मुक्ती मिळवण्याचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती अथवा व्यक्तीपूजा हा अधोगतीचा आणि शेवटी हुकूमशाहीचा निश्चित मार्ग आहे म्हणून समजावे. 

बाबासाहेबांनी हे फक्त राजकारणाच्या बाबतीत सांगितलं होतं, पण ते सर्वच क्षेत्रांत लागू होतं. मग ते क्रिकेटपटू, किर्तनकार, अभिनेते, नेते आणि त्यांचे अनुयायी असो किंवा मग धार्मिक पुढारी (पुजारी, मौलवी, पोप वगैरे) असो. 

मागच्या ब्लॉग मध्ये जो अक्षय कुमार, रतन टाटा यांचा उल्लेख होता, त्याबाबतीत काहीजण म्हणाले की; ब्लॉग मस्त होता, पण ते काही मला पटलं नाही. आता त्याचं कारण सांगतो. नरेंद्र मोदी हे व्यक्ती म्हणून कसे का असेनात, त्याचं आपल्याला काय करायचंय! मग त्यांनी चहा विकलेला असो, संन्यासी होण्यासाठी बायकोला सोडलेलं असो किंवा रात्रंदिवस काम करणं असो. आपल्याला पंतप्रधान म्हणून ते त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का, हे महत्वाचं आहे. मग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काही का करेनात! हिटलर त्याच्या आयुष्यात अत्यंत शिस्तप्रिय, दारू-स्री यांच्या आहारी न जाणारा तर विन्स्टन चर्चिल (त्याचवेळचे इंग्लंडचे पंतप्रधान) अत्यंत आळशी, सतत दारू पिणारे होते. पण काय झालं, इंग्लंड महायुद्ध जिंकलं आणि महासत्ता म्हणून उदयास आलं. तर हिटलर महायुद्ध हरला आणि त्याने आत्महत्या केली. अक्षय कुमारने मोदींच्या घेतलेल्या अराजकीय मुलाखतीतून मोदी व्यक्ती म्हणून कसे चांगले आहेत, हे दाखवलं (तेही निवडणूकीवेळी). त्यापेक्षा ते पंतप्रधान म्हणून कसे चांगले आहेत, हे दाखवायला पाहिजे होतं. 

राज्यघटना लिहताना बाबासाहेब आजारी होते. त्यांच्या पायाचे स्नायू खूप दुखत होते. त्यांचे डोळेही खराब झाले होते. अधूनमधून ते मुंबईला येऊन उपचार करत होते, पण त्याचा काही फरक पडत नव्हता. महत्वाचं म्हणजे, राज्यघटना लिहिण्याचा भार त्यांच्या एकट्यावरच पडला होता. कारण इतर सहा सदस्यांपैकी एकाचा मृत्यू झाला, दुसऱ्याने राजीनामा दिला, तिसरे अमेरिकेला गेले, चौथे संस्थानिकांसंबंधीच्या कामात गुंतून राहिले आणि उर्वरित दोघे प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीपासून दूर होते. त्यामुळे बाबासाहेब व त्यांचे कार्यवाह असे दोघेच लेखन समितीच्या बैठकीला उपस्थित असत. पण जर राज्यघटनाच जर व्यवस्थित नसती, तर या सांगण्याला काही अर्थ राहिला असता का ? 

दुसरं म्हणजे, विधानसभा निवडणूकीवेळी सुद्धा ८० वर्षांचा योद्धा एवढ्या पावसात भिजतोय म्हणून डंका पिटवला गेला. पण त्यांनी काहीही केलं, तरी महाराष्ट्राच्या विकासावर ते काय बोलतात, ते महत्वाचं नाही का ? नाहीतर मग निवृत्ती स्विकारून घरी बसावं. जसं अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष राजकारणात लक्ष घालत नाहीत तसं. मात्र काल परवापर्यंत पवारांचं कौतुक करणाऱ्यांची मोदींच्या नावाने आगपाखड चालू आहे, तर कालपर्यंत पवारांवर हल्लाबोल करणारे आज मोदींच्या सोबत उभे आहेत. दिवे लावायला लावून मोदी आपल्याला मूर्ख बनवत आहेत, असं वाटणाऱ्यांना राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात 'माझ्याकडे एकही गाडी नाही' असं सांगत राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवडून आलेले जाणते राजेही आपल्याला मूर्खच समजत होते की काय!!! हा प्रश्न का पडला नाही? -दौलत नाईकवाडे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर टीका करणारे साहेब अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचीट देणाऱ्या परमबिर सिंग यांच्या मुंबई पोलिस आयुक्तपदी केलेल्या नियुक्तीवर अगदी मूग गिळून का गप्प बसले ? आता काहीजण म्हणतील की, मी फक्त दोघांबद्दलच बोलतोय. अहो पण महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण या दोघांच्या भोवतीच फिरतंय. महत्वाचं म्हणजे, मी मांडलेल्या मुद्द्यांतील कोणता मुद्दा चुकीचा आहे का ? हा ब्लॉग मी काल रात्री न झोपता  लिहिला आहे. पण हे सांगण्यापेक्षा या लेखात मजकूर काय आहे, हे महत्वाचं नाही का ?

हीच गोष्ट इंदुरीकर यांच्यासारखे किर्तनकार, धोनी आणि सलमान यांसारख्यांचे चाहते, यांनाही लागू होते. कारण हेच नंतर प्रत्यक्ष राजकारणात येतात (गौतम गंभीर, सनी देओल) नाहीतर मग एखाद्या पक्षाला समर्थन देतात. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मी समजू शकतो, त्यात त्यांचा व्यक्तिगत फायदा असतो. पण सामान्य नागरिकांनी याचा विचार करायला हवा.

(कोरोनाची परिस्थिती नीट हाताळली नाही म्हणून प्रगल्भ लोकशाही म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेतील लोक ट्रम्पवर टीका करत आहेत. आपल्याकडे म्हणतात ही वेळ नाही, टीका करायची)

त्याच भाषणात बाबासाहेब पुढे म्हणतात :- 'भारतीय लोकशाहीचे संरक्षण करताना भारतीयांनी एक गोष्ट केली पाहिजे ती ही की, त्यांनी राजकीय लोकशाहीमुळे संतुष्ट राहू नये. राजकीय लोकशाहीचे त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाही ही जर सामाजिक लोकशाहीवर अधिष्ठित केली नाही, तर ती टिकूच शकणार नाही. भारतीय नागरिकांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती ही की, भारतात दोन गोष्टींचा अभाव आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे सामाजिक समता आणि आर्थिक समता. आपल्या आवेशयुक्त भाषणात देशाला धोक्याची सूचना देताना बाबासाहेब म्हणाले, "२६ जानेवारी १९५० रोजी आम्हांला राजकीय समता लाभेल. पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमता राहील. जर ही विसंगती आपण शक्यतो लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ज्यांना विषमतेची आच लागलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्धस्त करून टाकल्यावाचून राहणार नाहीत." 

इथं एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे बाबासाहेबांना समानता नाही, समता अभिप्रेत आहे. समानता म्हणजे सर्व सोयीसुविधा सर्वांना समान मिळणं. समता म्हणजे दोन वेगळ्या घटकांना कमी-अधिक प्रमाणात सोयीसुविधा देऊन अंतिमतः दोघांना समान पातळीवर नेणं. भारतात बऱ्याच वर्षांपासून अस्पृश्य आणि अल्पसंख्यांक समुदायांवर अन्याय केला गेला, त्यांना जगण्याचे मुलभूत अधिकार सुद्धा दिले गेले नाहीत. म्हणून मग ते दूर करण्यासाठी त्यांना शासन आणि प्रशासनात आरक्षण, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली गेली. पण तरीही आता खासगी किंवा सरकारी दोन्हीही ठिकाणी उच्चदर्जाची पदं ही बहुसंख्येने ब्राह्मणांकडेच आहेत. दुसरं म्हणजे, आर्थिक समता. गरीब आणि श्रीमंत म्हणून जन्माला येणं, त्यावरून प्रत्येकाला व्यवसायाच्या तसेच प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात. ते होऊ नये, गरीबांनाही पुढे जाता यावं म्हणून श्रीमंतांकडून कर गोळा करून गरीबांना अन्न, पाणी, शिक्षण, रोजगार यासाठी उपलब्ध करून देऊन गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी मिटवण्याचं काम करणं ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून बाबासाहेबांनी असा इशारा दिला होता की, लवकरात लवकर ही दरी मिटवली नाही तर लोकशाही टिकणार नाही. मागील १०-१५ वर्षांच्या काळात ही गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढलेली आहे. व्यक्तीपूजेचं भूत कित्येकांच्या मानेवर आरूढ झालेलं आहे. लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ असणारे कायदेमंडळ (लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद), कार्यकारी मंडळ (IAS, IPS, IRS), न्यायपालिका आणि वृत्तसंस्था हे चारही स्तंभ डळमळीत झाले आहेत. त्यामुळे भारतात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीच नांदत आहे. म्हणून आमचे मित्र रामेश्वर कुटे म्हणतात - नागरिक हो! जोपर्यंत मत, कर व संविधानाची किंमत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत प्रत्येक राजकीय पक्ष तुमचे शोषणच करील. 

बाबासाहेब त्यामुळे म्हणतात - खरोखर जर या राज्यघटनेप्रमाणे गोष्टी सुरळीत चालल्या नाहीत तर त्याला कारण आमच्या राज्यघटनेतील दोष नसून, मनुष्य समाजातील अधमपणा हाच असेल असे मला म्हणावे लागेल! त्याच काळी बाबासाहेब विद्यार्थ्यांना असं म्हणतात की, कोणत्याही समाजाची प्रवृत्ती ही तो समाज शिक्षणात किती पुढे जातो यावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी आपली दृष्टी व्यापक केली पाहिजे. लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते सोडविण्याचे सामर्थ्य आणि विचारशक्ती यांचा त्यांनी विकास केला पाहिजे. 

माझ्या मते, अशक्त शरीराची नाही तर अशक्त विचारांची माणसं गुलामगिरीला बळी पडतात. बलात्काऱ्यांना फाशी, आरोपींचा एन्काउंटर, पोलिसांच्या मारहाणीचं समर्थन, धर्माकडे जास्त ओढा, राष्ट्रीय एकतेचा चुकीचा अर्थ लावणे ही सर्व अशक्त विचारसरणीची प्रतीकं आहेत. हे सगळे शॉर्टकट्स आहेत. पण दूरदृष्टीने विचार करून योग्य तेच स्विकारायला हवं. त्यामुळे महापुरूषांना वाचून, इतरही वाचन वाढवून, वर्तमानपत्र वाचून आपली विचारसरणी प्रगल्भ करायला हवी.

- प्रतिक दत्तलता होले

Friday, 3 April 2020

कोरोना आणि आपली सरकारं

(ज्यांना त्यांच्या प्रिय शासनावरील खऱ्या मुद्द्यांवर आधारित माहिती आवडणार नाही, त्यांनी न वाचलेलंच बरं)

 मधमाशी जसा फुलाकडून रस शोषते, त्याचा फुलाला काहीच त्रास होत नाही. तसा सरकारने जनतेकडून कर गोळा करायला हवा. - आचार्य चाणक्य

आता पेट्रोलचा खरेदी, शुद्धीकरण आणि वाहतूक खर्च धरला तर साधारण २० ते २५ रूपये प्रतिलीटर असा सरकारला खर्च येतो. त्यावर केंद्र आणि राज्य सरकार मिळून प्रतिलीटर साधारण ६० रूपये इतका कर गोळा करत आहेत. वरून प्रत्येक गोष्टींवर अप्रत्यक्षरीत्या म्हणजेच प्रत्येक वस्तू जसे की स्टेशनरी, बिस्कीट, साबण इ., सिगारेट, तंबाखू, दारू यांवरील कर आणि मनोरंजन कर (चित्रपटगृह) तसेच पाच लाखांच्या वरील उत्पन्नावरील कर या आणि अशा प्रकारे प्रचंड लूट चालू आहे. पहिलं चित्रपटात दाखवतात, तसं जनतेला मारहाण करून कर वसूल करायचे. आता मारहाण न करताही अप्रत्यक्षरीत्या प्रचंड लूट चालू आहे. 

बरं सरकारला पैसे लागतात सोयीसुविधांसाठी. पण तो तरी व्यवस्थित खर्च होतोय का ? त्या पैशांतून चालू आहे स्मारकांच्या उंचीची स्पर्धा. आमदार आणि खासदार यांची पगार आणि पेन्शन वाढ, गाड्या, सुरक्षा तसेच बंगल्यांची डागडुजी यावर करोडोंची उधळपट्टी.

अंबानी, टाटा, अक्षय कुमार आणि बाबा रामदेव
प्रत्येक राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारासाठी आणि जाहिरातीसाठी भरपूर पैसे लागतात. तो पैसा त्यांना उद्योगपती पुरवतात. मग निवडून आल्यावर ते त्यांना काँट्रॅक्ट्स देतात. ते निवडून यावेत, म्हणून अधूनमधून ते उद्योगपती सुद्धा त्यांची प्रशंसा करतात. आता जे मोदींनी 'पीएम केअर्स फंड' चालू करून त्यामध्ये पैसे पाठवण्याचं आवाहन केलं की लगेच अक्षय कुमार, रतन टाटा, अंबानी, बाबा रामदेव यांनी अपेक्षेप्रमाणे पैसे दिले आणि त्याची जाहिरातही केली. आता तुम्ही म्हणाल की, त्यात गैर काय ? तर अगोदर या सरकारने व्यवस्थित काम करायचं नाही आणि नंतर असं हात पसरायचं. अक्षय कुमार मुळातच भारतीय नाही, तर कॅनडाचा नागरिक आहे. तो दरवेळी पैसे देतो. त्याचं कारण लोकसभा निवडणूकीवेळी समजलं, मोदींच्या घेतलेल्या अराजकीय मुलाखतीवेळी. त्यातून मोदी व्यक्ती म्हणून कसे चांगले आहेत, हे दाखवलं होतं. टाटा, अंबानी आणि बाबा रामदेव तर काय उघडपणेच मोदींवर स्तुतीसुमनं उधळत असतात. रतन टाटा म्हणाले की, १,५०० कोटी काय, वेळ पडली तर देशासाठी संपूर्ण संपत्ती दान करीन. २०१७ या वर्षात भारतामध्ये १ कोटी १० लाख लोक उपासमारीने मेले. मग तेव्हा का नाही मदत केली ? 

No person, however great, is greater than the country. दुसऱ्या कोणत्याही देशांपेक्षा भारतात जास्त सावधगिरी बाळगायला हवी. कारण दुसऱ्या कोणत्याही देशांपेक्षा भारतात व्यक्तीपूजेचा इतका जबरदस्त परिणाम होतो, तसा जगातील इतर कोणत्याही देशांत होत नाही. जे लोक राष्ट्राची सेवा करतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही. परंतु त्या कृतज्ञतेस काही मर्यादा असते. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, २५ नोव्हेंबर १९४९ (संविधान सभेतील भाषण)

आता येऊया, कोरोना आणि आपल्या सरकारांच्या हलगर्जी कारभाराकडे
पहिलं म्हणजे, वर सांगितल्या प्रमाणे नको त्या गोष्टींवर खर्च केला. आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या फक्त चार टक्के तरतूद. त्यातीलही निम्मे कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर अगोदरच्या आरोग्य योजनांवर खर्च होतो. निम्म्या म्हणजेच जेमतेम २,५०० कोटी रूपये उरतात नवीन रूग्णालय बांधकाम, जुन्या इमारतींच्या दुरूस्ती आणि वैद्यकीय उपकरणे, गोळ्या-औषधे खरेदीसाठी. 

हे सर्व झालं मागचं. आता सरकार कुठं चुकलं ?
चीनमध्ये डिसेंबर-जानेवारी मध्ये कोरोनाचं थैमान चालू झालं होतं. मार्चच्या सुरूवातीला ते युरोप आणि अमेरिकेत पसरायला सुरूवात झाली. भारतात जेमतेम १० केसेस होत्या. मग तरीही सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची चाचणी का केली नाही ? ज्या देशांची यादी केंद्र सरकारने केली होती (ज्यात दुबई, अमेरिका नव्हते), त्या देशांतून येणाऱ्या नागरिकांचीही चाचणी न करता फक्त शरीराचं तापमान बघून सोडून देण्यात आलं. हा मुद्दा केंद्र सरकारचा होता, हे मान्य. मात्र, राज्य सरकारने तरी त्यांना १४ दिवस वेगळं ठेवायला पाहिजे होतं. दुबईतून आलेले प्रवासी बिनधास्तपणे सगळीकडे फिरत राहिले आणि त्यांच्यापासून इतरांना सुद्धा संसर्ग झाला. 

मोदींनी केलेली लॉकडाऊनची घोषणा
वास्तविक मुख्यमंत्र्यांनी जसं टप्प्याटप्प्याने पावले उचलत एकएक गोष्ट बंद केली. जेणेकरून कोणाचेही हाल होवू नयेत, तसं पंतप्रधानांनी करायला हवं होतं. पण त्यांना फक्त प्रसिद्धी हवी असते. ते ८ वाजता आले आणि लगोलग २१ दिवसांचा लॉकडाऊन (निश्चलनीकरण सारखं) घोषित केला. त्याची अगोदर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही कल्पना दिली गेली नाही. मग लगोलग लोकांनीही किराणा, भाजीपाला घ्यायला गर्दी चालू केली. परत मुख्यमंत्र्यांना येऊन सांगावं लागलं की, अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.

३-४ दिवसांपूर्वी इराणवरून विशेष विमानाने लोकांना परत आणलं गेलं. पण उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड येथील राज्यांतून दुसऱ्या राज्यांत कामाला गेलेल्या मजुरांनी पायपीट करत गाव गाठायला सुरूवात केली. आहे तिथे काम बंद झाल्याने राहणं अवघड झालं होतं. NDTV ने यावर वार्तांकन केल्यावर मग केंद्राने राज्यांना या मजुरांची आहे त्याठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय करायला सांगितलं. 

त्या अगोदर लॉकडाऊन घोषित केल्यानंतर अनेक जणांनी मुद्दा उपस्थित केला की, हातावर पोट असणाऱ्यांचं काय ? मग केंद्र सरकारने समिती नेमली. नंतर दोन दिवसांनी धान्य वाटपाची घोषणा केली. दुसऱ्या दिवशी, १ लाख ७० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. ज्यातही थेट लाभ हस्तांतर निधी अत्यंत तुटपुंजा होता. केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गरीब कुटुंबांना महिन्याला २००० ते ४००० रूपये देण्याची घोषणा केली. तशी घोषणा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अजूनही केलेली नाही.

दोनच दिवसांपूर्वी भारताने सर्बिया या देशाला तब्बल ९० टन वैद्यकीय साहित्य पाठवली आणि इकडे डॉक्टरांना कोणत्याही साधनांविना जीव धोक्यात घालून रूग्णांना तपासावं लागतंय.

पीएम रिलीफ फंड, पीएम केअर याला मदत करा म्हणून आवाहने करायची तरी कशाला मग? आणि लोकांनी तरी पोटाला चिमटे काढून मदत का करायची त्यात? कोणत्या तोंडाने शासकीय कर्मचाऱ्यांचे कोरोनाआपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली वेतन कापायचे? हे म्हणजे बायकोनं काटकसरीने संसार करायचा, अन दादल्याने शेजारणीला दागिने करायचे, असंच झालं हे.. 
- डॉ. सचिन लांडगे


कोरोनाचं संकट भयंकर असलं, म्हणून काही आणीबाणी जाहीर केलेली नाही. त्यामुळे जिथं सरकार चुकतंय, तिथं सरकारला विरोध करून योग्य काम करायला भाग पाडायला हवं. महत्वाचं म्हणजे, आम्ही प्रशासनाला कोरोनाला हरवण्यासाठी पूर्ण सहकार्य करू.

याआधीही प्लेग, कॉलरा, पटकी यांसारखे साथीचे रोग येवून गेलेत. कोरोनाही जाईल. कारण काही वेळेनंतर शरीरामध्ये त्या विषाणू विरूद्ध लढण्याची रोगप्रतिकार शक्ती निर्माण होत असते.  पण कोरोनापेक्षाही भयंकर आणि कायमस्वरूपी असणारे रोग म्हणजे बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या. त्यांचं काय ? महत्वाचं म्हणजे, कोणत्याच सरकारला यावर अजून तरी लस सापडलेली नाही. विशेष म्हणजे, २०१८ या वर्षात शेतकऱ्यांपेक्षा जास्त आत्महत्या बेरोजगारांनी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संविधान साक्षर आणि अर्थसाक्षर होऊन सरकारवर नजर ठेवायला हवी.

गेल्या २४ वर्षातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या
एकूण:- 3,54,421
सरासरी वार्षिक आत्महत्या:- 14,767
सरासरी दररोज आत्महत्या:- 41
2017:-10665
2018:-10349

ही NCRB (National Crime Records Bureau) म्हणजेच सरकारी आकडेवारी आहे. खरा आकडा यापेक्षा जास्त असू शकतो.

- प्रतिक दत्तलता होले

Monday, 30 March 2020

शिवायचं नाय

का शिवायचं नाय ? असा जर प्रश्न लहाणपणी विचारला, तर उत्तर मिळायचं की; कावळा शिवून गेलाय. बरं! मग कधी रात्रीच्या वेळी असं शिवायचं झालं, तर प्रश्न पडायचा. 🤔 रात्रीचं कसा कावळा येत असेल ?

नंतर मित्रांकडून काही माहिती मिळाली. १२ वीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात ज्याला 'मासिक पाळी' (menstruation) म्हणतात, त्याबद्दल शास्त्रीय आणि खरी माहिती मिळाली. ती अशी की, वयाच्या १३ ते १५ वर्षांपासून मुलींमध्ये हे सुरू होतं.  महिन्यातून २ ते ७ दिवस स्त्रीच्या योनीतून रक्तस्राव होतो. 

आता येवूया मूळ मुद्द्याकडे...
असं जर असेल आणि हे नैसर्गिकरीत्या घडत असेल, तर मग मुलींनी वेगळं बसायची प्रथा का ? त्याचे फायदे-तोटे काय ?
माझ्या मते, पूर्वीच्या काळी आतापेक्षा स्रियांना शेतातील आणि घरातील अशी खूप कष्टाची कामं असायची. पण या मासिक पाळीच्या दरम्यान मुलींना थकवा जाणवतो. तसेच, पोटदुखी आणि पाठदुखीही जाणवते. त्यामुळे त्यांना आराम मिळावा, म्हणून ही प्रथा असू शकते. दुसरी शक्यता म्हणजे, या मासिक पाळीमुळेच स्त्रियांच्या अंडाशयाची वाढ होत असते, जे की गरोदर राहण्यासाठी आवश्यक असतं. पण या दरम्यान जर शरीरसंबंध ठेवले, तर ते धोकादायक ठरू शकतं. म्हणून काहीशा वेगळ्या स्वरूपात लांब राहण्याची प्रथा असेल.

मला काय म्हणायचं आहे ?
मी हे लिहिलं, यासाठी की ज्या स्रिया वयोवृद्ध आहेत किंवा ज्यांचं लग्न होवून काही वर्ष झाली असतील, त्यांना वेगळं रहायचं काही वाटत नसेल. पण ज्यांना नुकतंच हे सुरू झालेलं आहे आणि ज्या मुली तरूण आहेत, त्यांना या गोष्टीची लाज वाटते. घरी कोण आलं, तर चारचौघात न मिसळता त्यांना वेगळं बसावं लागतं. इतर वेळी, सर्वांबरोबर मिळून खेळता येतं. मात्र, आता वेड्यागत नुसतं एकटीने बसायचं. त्यात महत्वाचं म्हणजे, थंडी असली तरी त्यांना  अंथरूण वगैरे थोडंच मिळतं, कारण शिवल्यामुळे ते नंतर धुवावं लागतं. एक माणूस म्हणून, ही खरंच खूप लाजीरवाणी गोष्ट आहे. 

गैरसमज -
शिवताशिवत केली की, घरात गोम, विंचू निघतात.😂
हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे, ते पाळावं लागतं. मग माझा प्रश्न, १) पहिलं नवरा मेल्यानंतर बायकोलाही जिवंतपणे तीच्या मुलांसमोर जाळायचे.
२) पहिलं मुलींना शिक्षण देणं, म्हणजे पाप होतं.
३) दवाखान्यात गेल्यावर आणि सुई टोचल्यावर विटाळ व्हायचा.
अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्या काळानुसार बदलल्याच ना ? काळानुसार आपल्यामध्ये बदल करत जाणं, यालाच तर 'उत्क्रांती' म्हणतात ना. कोणत्याही गोष्टी अंधपणाने स्वीकारण्यापेक्षा त्याची शहानिशा करायला हवी. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्या गोष्टीकडे पहायला हवं. घरच्यांशी या बाबतीत स्पष्टपणाने बोलायला हवं. आपल्यावर लादलेली अन्यायकारक गोष्ट निमूटपणानं सहन करणं, हे एकप्रकारे गुलामगिरीचंच लक्षण आहे.

- प्रतिक दत्तलता होले