Monday, 13 April 2020

मला समजलेले बाबासाहेब

२८ नोव्हेंबर १८९० ला एक महात्मा काळाच्या पडद्याआड गेला. पण साडेचार महिन्यांतच दुसऱ्या महामानवाचा अनिष्ठ जातीपातींच्या रूढी तोडायला उदय झाला. त्यांची प्रत्यक्ष भेट घडली नाही, मात्र त्यांच्या कार्याने त्यांना एकत्र आणलं. त्यांचं नाव भीमराव रामजी आंबेडकर.

एखादा प्रियकर जेवढं त्याच्या प्रेयसीवर प्रेम करतो, त्यापेक्षा जास्त प्रेम बाबासाहेबांनी पुस्तकांवर केलं. शहाजहानने त्याच्या प्रेयसीसाठी ताजमहाल बांधला, बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकांसाठी राजगृह बांधलं. त्यांना ज्ञानाच्या भूकेमुळे पोटाची भूक दिसत नव्हती. मी तुम्हाला आवाहन करतो, की एकदा या असामान्य कर्तृत्वाला वाचा. मी खात्रीशीर सांगतो, तुमची ज्ञानाची भूक वाढल्याशिवाय राहणार नाही. कंटाळा, आळस, निराशा तुम्हाला कधीच गाठणार नाही. 

जे म्हणतात की, त्यासाठी पहिल्यापासूनच अभ्यासाची गोडी लागते. त्यांना बाबासाहेबांच्याच आयुष्यातील एक प्रसंग सांगतो. बाबासाहेब लहान असताना अभ्यासात त्यांचं मन रमत नव्हतं. तेव्हा त्यांनी घरच्या परिस्थितीला हातभार लागावा, म्हणून मुंबईला कापड गिरणी मध्ये कामाला जायचं ठरवलं. त्यावेळी ते साताऱ्याला राहत होते. कामाला मुंबईला जाण्यासाठी त्यांनी त्यांच्या आईने साठवून ठेवलेलं पैसे चोरण्याचंं ठरवलं. ते चोरलेही, पण मुंबईला जाण्यापुरते ते पैसे पुरेसे नव्हते. मग त्यानंतर मात्र त्यांनी ज्ञानप्राप्तीचा असा वेग पकडला की त्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या तुम्हां-आम्हांसारख्या कोट्यवधी लोकांचा आपल्या ज्ञानप्रकाशाने उद्धार केला. 
(स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना संविधानाची प्रत अर्पण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर. मागे पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद.)

बाबासाहेबांच्या कार्यांतील कळसोध्याय म्हणजे, संविधान निर्मितीचं काम. पायाच्या स्नायूंच्या प्रचंड वेदना, डोळे म्हणजेच दृष्टी कमी झालेली, घटना समितीच्या सात सदस्यांपैकी फक्त एकट्यावरच पडलेला कामाचा भार अशा विपरीत परिस्थितीतही भारत देश अखंड ठेवण्यासाठी, मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी, तळागाळातील लोकांच्या उत्कर्षासाठी जगातील सर्वांत सुंदर पुस्तक म्हणजे भारतीय संविधान निर्माण करणं आणि घटना समितीच्या सदस्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन प्रत्येक कलम समजावून सांगणं म्हणजे अर्थातच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला तो ज्ञानयज्ञच होता. हे करत असताना ते अधूनमधून मुंबईला येऊन उपचार घेत असत. जात, धर्म, लिंग, वर्ण, भाषा, पेहराव अशा कोणत्याही घटकांवर भेद न करता सर्वांना समान दर्जा व मुलभूत अधिकार; सर्वांना आपला सामाजिक आणि आर्थिक उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली दर्जाची व संधीची समानता; सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय; व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता देणारं संविधान निर्मितीचं काम यामुळेच बाबासाहेब खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतात आणि जगातही मान्यता पावले.


(स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून शपथ घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर)

मजूरमंत्री असताना कामगारांसाठी कामाची आठ तासांची मर्यादा, किमान वेतन निश्चिती, पगारी रजा, ज्यादा कामाचे तासाप्रमाणे दुप्पट वेतन, आरोग्य विमा, कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरांची उपलब्धता असे अनेक फायदे त्यांनी कामगारांना मिळवून दिले. स्रियांनाही पुरूषांप्रमाणे समान वेतन, मातृत्व रजा, घटस्फोट कायदा, वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार बाबासाहेबांनी मिळवून दिले. सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा अमेरिकेतही नव्हता आणि आजही कित्येक देशांत नाही, तेव्हा स्रियांना अमूल्य असा मतदानाचा हक्क दिला.

कोणत्याही महापुरूषांना मानण्यासाठी त्यांच्या जातीचं नाही, तर त्यांच्या विचारांचं असावं लागतं. ज्या देव-धर्माने दलितांना मंदिरात जाण्यासाठी बंदी केली होती म्हणजेच देव-धर्माने रूढी-परंपरांच्या नावाखाली समाजाला विभागण्याचं काम केलं होतं आणि त्या विभागलेल्या समाजाला बाबासाहेब, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकत्र आणण्याचं काम केलं होतं. पण आज बहुसंख्य समाज देव-धर्माच्या नावाखाली एकत्र येतोय आणि महापुरूषांचे अनुयायी (सर्व नाही) विभागले गेलेत. 

या भीमजयंतीला आपण सर्वांनी संविधान समजून घेण्याचा, आपल्यामध्ये रूजवण्याचा, इतर लोकांना समजून सांगण्याचा, जनजागृती करण्याचा संकल्प करूया. तीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.

(आमचे ५-६ वीचे कला शिक्षक अतुल गायकवाड सर यांनी कलर पेन्सिलचा वापर करून काढलेले बाबासाहेबांचे व्यक्तीचित्र)

ज्ञानाच्या अथांग महासागरास विनम्र अभिवादन.

- प्रतिक दत्तलता होले


7 comments:

  1. अतिशय छान लेखन ����

    ReplyDelete
  2. खूप सुंदर प्रतीक दादा

    ReplyDelete
  3. खुप छान, अत्यंत कमी शब्दात खुप काही सांगणारा लेख आहे.

    ReplyDelete
  4. Chan pratik.. keep it up bro.✌️👌👍

    ReplyDelete