Thursday, 28 May 2020

ती आणि तो :- गोष्ट त्या दोघांची (भाग २)

शाळेतल्या अभ्यासक्रमाबरोबरच तो नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचीही कसून तयारी करत होता. त्या परीक्षेला पुढील इयत्तांचे गणिताचे प्रश्न असायचे. त्याचे गणिताचे शिक्षक सुद्धा खूप छान पद्धतीने शिकवत असल्यामुळे त्याचं गणित एकदम उत्तम होतं. त्याच्या गावातील वयाने मोठे असणाऱ्या १-२ मित्रांकडून सुद्धा त्याने मार्गदर्शन घेतलं होतं. वर्गातील गृहपाठ वगैरे काही तो करत नसायचा. शिक्षकांना त्याने सांगितलं होतं की, मी नवोदयची तयारी करत असल्यामुळे मला शाळेतील अभ्यासाला जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे शिक्षक त्याला शिक्षा करत नसायचे. पण एवढ्या कष्टाने, जिद्दीने तयारी करूनही तो नवोदयच्या यादीत क्रमांक मिळवू शकला नाही. त्याच्याबरोबरच उन्हाळी तासात पैकीच्या पैकी गुण मिळवणाऱ्या त्या 'अ' तुकडीतील मित्राला मात्र प्रवेश मिळाला. तो यामुळे खूपच निराश झाला. मित्रांनी नवोदयचं विचारलं की, ते सांगताना त्याच्या डोळ्यांत आपोआप पाणी यायचं. 


इकडे मात्र ती दररोज त्याला जागा पकडायची. दोघे एकाच सीटवर बसून गप्पा मारत घरी जायचे. शाशिच्या तासाला दोघे एकमेकांकडे पाहत एकमेकांची थोडीशी चेष्टा करत, बोलत बोलत पूर्ण मैदान फिरून यायचे. तो सुरपाट, कबड्डी, खो-खो खेळताना ती दूर झाडाखाली थांबून त्याला पाहत रहायची. तोही मग मुद्दाम तिच्याकडे पाहत तिला इम्प्रेस करण्यासाठी इतर मुलांवर दादागिरी वगैरे करायचा. सर्व खेळांत मग कर्णधार पद तो स्वतःकडेच घ्यायचा. त्याच्या आईला शिवायचं नसेल तेव्हा ती त्याला स्वतःचा डबा खायला द्यायची. कधीकधी तर तीच्या मैत्रीणींसोबत तो तीच्या गटात एकटाच जेवायला जायचा. तो गणितात हुशार असल्याने ती त्याच्यापेक्षा २ वर्षांनी मोठी असूनही तो तिची गणितं तीला समजावून सांगायचा. असंच आनंदात, मजेत एकेक दिवस पुढे सरकत होता. 

ती आठवीत आणि तो सहावीत होता, तेव्हा ५वी ते ८वी शाळा दुपारच्या सत्रांत असायची. ती नववी आणि तो सातवीत गेल्यानंतर ५वी ते ७वी दुपारी आणि ८वी ते १०वी सकाळच्या सत्रांत, असं वेळापत्रक त्यांना सोयीस्कर असंच बदललं होतं. तो सातवीत असताना ती नववीत होती, त्यावेळी शाळेची वेळ वेगवेगळी असल्यामुळे त्यांना काही जास्त भेटता येत नव्हतं.

सातवीच्या वार्षिक परीक्षेत एका गुणामुळे त्याला प्रथम क्रमांक मिळू शकला नाही. त्याला नवोदयमध्ये यश मिळालं नव्हतं. मात्र त्या जीव लावून केलेल्या अभ्यासामुळे त्याला सातवीच्या शिष्यवृत्ती, आठवीच्या NMMS परीक्षेत अभ्यास न करताही यश मिळालं होतं. केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही, हे मात्र त्याला आता पक्कं समजलं होतं. ती दिसायला सुंदर होती, मात्र अभ्यासात मध्यमच होती. तो अभ्यासात खूप हुशार आणि ती दिसायला खूप सुंदर असल्याने सर्वांमध्ये साहजिकच त्यांच्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगली होती. तीच्या वर्गातील काहीजण तर त्याला उपहासाने विचारायचे की, "व्हंय. तीनं तुला प्रपोज केलाय काय ?" तो मात्र 'नाही' म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा.

तो आठवीत गेल्यानंतर त्याच्या शिष्यवृत्तीच्या पैशांमध्ये वडिलांनी अजून पैसे टाकून त्याला अँड्रॉईड फोन घेऊन दिला होता. ती दहावीत होती. तीही तीच्या वडिलांच्या व्हॉट्स अपवरून वडिलांच्या नकळत त्याच्याबरोबर बोलत होती. आठवीत आल्यापासून त्याच्यात पौगंडावस्थेची लक्षणं दिसायला लागली होती. त्याला आता तिच्याबद्दल शारिरीक आकर्षण सुद्धा वाटत होतं. तीला तर तो पहिल्यापासूनच आवडत होता. तो आता व्यवस्थित टापटीप राहत होता. कपड्यांना इस्त्री करायचा, सारखं सारखं कंगव्याने केस विंचारायचा, रूमालात पावडर ठेवायचा, दररोज शाळेत जाताना बूट स्वच्छ पुसल्याशिवाय घालत नव्हता. तीच्याही चेहऱ्यावर थोड्याशा तारूण्यपिटीका आल्या होत्या. शरीराला आकर्षक आकार प्राप्त झालेला होता.

प्रथम सत्राच्या काही दिवस अगोदर तो आणि त्याचे मित्र स्टँडवर बसले होते. ती आणि तीच्या मैत्रीणीही होत्या. आता मात्र दोघेही घरी जायची घाई करत नव्हते. एकमेकांचा हातात हात घेऊन भविष्याची आशादायक चित्रेही ते कधीकधी रंगवत होते. त्यादिवशी तीच्या वर्गातील काही मुलं मुद्दाम त्याच्या नावाने तीला चिडवत होते. दुसऱ्या दिवशी, तीने प्राचार्यांकडे त्या मुलांची तक्रार केली. प्राचार्यांनी त्या मुलांना ताकीद दिली. नंतर त्यांच्यातील एकजण त्याला येऊन म्हणाला, "काय लका, आधी नाय का सांगायचं. ती तुझी बहीण लागते म्हणून!" तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. मित्रांबरोबर आणि घरीही आता तो कोणाला जास्त बोलत नव्हता. एकएकटा राहत होता. तो तीला टाळायला लागला. तीच्यापासून दूरदूर रहायला लागला होता. 

एका आठवड्याने दुपारी तीचा फोन आला आणि तीने विचारलं, "का रे असं वागतोयंस ?" 
तो :- मी भाऊ आहे तुझा ??
ती :- हो...
तो :- मग ठेवतो मी फोन. 😡😠
ती :- अरे थांब... गंमत केली यार... 😃
तो :- मी तुझ्याकडे कधीच बहीण म्हणून पाहिलं नाही. 😥
ती :- अरे मग, मी काय सांगणार होते सरांना ? मी मुद्दाम त्यांना खोटं सांगितलं. 😇
तो :- खरं म्हणतीयेस ना तू ?
ती :- हो रे बाबा. 🤗
तो :- I  really love you ❤ very much dear.
ती :- मला पण तू खूप आवडतोस रे. Same to you my heartbeat.

प्रथम सत्राची परीक्षा झाली. दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या. तो हुशार आहे आणि आम्ही दोघे मित्र आहोत, हे तीने तीच्या आईला सांगितलं होतं. तीच्या आईने त्याला दिवाळीचा फराळ खायला आणि घर पहायला बोलवलं. हुशार आहे म्हटल्यावर आपल्या मुलीला अभ्यासाचं सुद्धा काहीतरी सांगेल, हा भाबडा आशावादही तीच्या आईच्या मनात होताच. तो तीच्या घरी गेला. बाहेरून त्याने हाक दिली. तीच्या मोठ्या भावाने दार उघडलं. तो डिप्लोमाला होता. इतक्यात ती आली आणि तीने त्याला आत घेतलं. तीच्या आईने त्याला फराळ दिला. त्याला फराळ जास्त आवडत नव्हता, पण तीच्या कुटुंबियांबरोबर बोलत बोलत त्याने कसाबसा तो संपवला. काही वेळेनंतर तीचे वडील आणि भाऊ शेतात गेले. ती त्याला म्हणाली, "चल तुला टेरेस दाखवते". काहीही न बोलता तोही शांतपणे तीच्या मागोमाग टेरेस वरती गेला. 

ब्लॅक नाईट पँट आणि पिंक टी-शर्ट, मोकळे सोडलेले आणि टेरेस वरती वाऱ्यामुळे उडणारे तीचे ते कुरळे केस यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे एकटक पाहत ऊन्हातच थांबला होता. ती लहान आवाजात त्याला म्हणाली, "अरे वेड्या... माझ्याकडे काय पाहतोयस! ऊन्हाने पाय भाजत असतील ना!  त्याने फक्त नकारार्थी मान डोलावली. तीने त्याला एका हाताने तीच्या आत असणाऱ्या अभ्यासाच्या खोलीत ओढलं आणि तीला काही कळायच्या आत त्याने त्याचे 👄💋 ओठ तीच्या ओठांवर टेकवले. तीने डोळे मिटून घेतले. त्याने तीचा दुसरा हात हातात घेतला आणि ओठात ओठ घालून तो तीच्या रसाळ ओठांचा आस्वाद घेऊ लागला. पायऱ्यांवरून कोणीतरी वरती येत असल्याचा तीला आवाज आला आणि तीने त्याला दूर सारलं. अनपेक्षित आणि इतक्या चटकन घडलेल्या या प्रसंगाने तो भलताच खूष झाला होता, तर तीची धाकधूक वाढलेली होती. तो लगेच तिथून त्याच्या घरी निघून गेला. 

आता मात्र दोघांच्याही अंतिम परीक्षा जवळ आल्या होत्या. दोघेही भरपूर अभ्यास करायला लागले. परीक्षा झाली. त्याला यावेळी ७ गुणांनी प्रथम क्रमांक प्राप्त झाला होता. तीचा परीक्षा क्रमांक आणि आईचे नाव त्याला माहित असल्याने त्याने स्वतःच्या मोबाईलवर तीचे गुण पाहिले. तीला ८९.३४℅ मिळाले होते आणि विशेष म्हणजे, गणितात ९४ गुण होते. तीचा शाळेत पाचवा आणि गणितात प्रथम क्रमांक आला होता. त्याने लगेच तीला अभिनंदन करण्यासाठी फोन केला, पण फोनच लागेना. तो दिवसभर फोन लावत राहिला, पण फोन संपर्कक्षेत्राच्या बाहेरच. तो दुसऱ्या दिवशी तीच्या घरी जाऊन आला, तर घरालाही कुलूप. बक्षीस वितरण समारंभालाही ती आली नाही. त्याने तीच्या सर्व मैत्रीणींना विचारलं, पण त्यांनाही काहीच माहिती नव्हतं. त्याने आतापर्यंत कित्येक वेळा तीला फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर वर शोधलं. पण खिन्न मनाने, 😓 वेड्यासारखा तीचा शोध तो अजूनही घेतोय.

------------ कथामालिका समाप्त ------------

- प्रतिक दत्तलता होले

Monday, 25 May 2020

ती आणि तो :- गोष्ट त्या दोघांची

पाचवीला सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेण्यासाठी चौथीनंतर उन्हाळी तास असायचे. त्यामध्ये इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांची प्रत्येकी २५ गुणांची दोनवेळा चाचणी व्हायची. त्या चाचणीमध्ये त्याला आणि त्याच्या एका मित्राला सर्व विषयांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले होते. (पण गंमत अशी की, त्यातील ५ गुण हे त्याने कॉपी करून मिळवलेले होते. मात्र त्याने हे कोणालाही कळू दिलं नव्हतं.) प्रथम आलेले ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्रही होते आणि तितकेच उनाड सुद्धा. ११ वाजता तास संपल्यानंतर अश्लील गप्पा मारणे, एकमेकांना शिव्या देणे, विचित्र विनोद करणे; असे उद्योग त्यांचे दररोजच चालायचे. 

तो एकदम विचित्र रहायचा. सकाळी विंचरलेल्या केसांकडे परत पाहत सुद्धा नसायचा. पायात पावसाळी चप्पल, खिशाला २ रूपयांचा पेन, त्याच्यातून खिशाला लागलेली शाई, गडबडीत एसटीत चढताना थोडीशी फाटलेली शाळेची हाफ पॅन्ट, पॅन्टची चेन खराब झाल्यामुळे चेनऐवजी लावलेलं बटन आणि या सर्वांच्या जोडीला त्याचे दुसरे दोन मित्र. तेही त्याच्यासारखेच. तिघे मिळून कोणाचीही चेष्टा करायचे. इतरांना चिडवायचे. मुलींवर अश्लील टिप्पणी करायचे. त्या तिघांनी आणि त्याच्या इतर मित्रांनी दादागिरीसाठी एक छोटी गँग पण तयार केली होती. एकंदरीतच अभ्यासात हुशार, पण वैयक्तिक जीवनात एकदम बिनधास्त असणारा तो. 

एका महिनाभराच्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली. त्या दोघांनाही समान (पैकीच्या पैकी) गुण असल्याने आडनावांनुसार त्याला 'ब' तुकडी मिळाली आणि त्याच्या मित्राला 'अ'. पहिल्या दिवशी बाक पकडण्यासाठीची धावपळ आणि साहजिकच त्यातून झालेली थोडीशी भांडणं. नंतर उंचीनुसार बसवल्यामुळे बैठक व्यवस्थेचा प्रश्न मार्गी लागला. एका महिनाभरात वर्गशिक्षक, इतर विषयांचे शिक्षक, नवीन मित्र यांच्या ओळखी झाल्या होत्या. प्रथम क्रमांकाचे अभिनंदन झाले आणि त्याच्याच शब्दांत सांगायचं झालं तर, "दणक्यात एन्ट्री झाली".

जुलैमध्ये त्याच्या एका मित्राच्या वाढदिवसाला मित्राबरोबर तो दुसऱ्या वर्गांतील शिक्षकांना चॉकलेट वाटत होता. त्यावेळी त्याला उन्हाळी तासाला असणारे एक शिक्षक 'सातवी-ब' या वर्गात शिकवत होते. त्यांनी त्याला बोलावून घेतलं आणि विद्यार्थ्यांना "या मुलाने उन्हाळी तासात पहिल्यांदाच पैकीच्या पैकी गुण मिळवलेत", असं सांगून त्याचे अभिनंदन करायला लावले आणि त्या वाढदिवस असणाऱ्या मुलाने त्यांना दिलेलं चॉकलेट सरांनी त्याला दिलं. एकदा त्याच्या एका मॅडमनी वर्गातील सर्व मुलांना गोंधळ घातल्याबद्दल हात वर करून उभे राहण्याची शिक्षा दिली होती. पण त्याला सोडून. कारण मॅडमचा त्याच्यावर विश्वास होता आणि मॅडम त्याचवेळी इतर मुला-मुलींना म्हणाल्या होत्या, "हा अष्टपैलू हिरा आहे". या दोन्ही प्रसंगाची साक्षिदार अर्थातच ती 👀 होती. पहिल्या प्रसंगात ती त्याच वर्गातील विद्यार्थीनी होती. तर दुसऱ्या प्रसंगी, ती मॅडमसाठी खडू घेऊन आली होती. त्यामुळे तीने ते पाहिलं होतं. 

शारिरीक शिक्षणाच्या (शाशि) तासाला 'सातवी- ब' आणि त्याचा वर्ग मैदानावर होता. तो त्याच्या मित्रांबरोबर 'चिरं-वांगे' खेळत होता. तो सुरपाट, खो-खो, कबड्डी, रवारवी या खेळांतही तरबेज होता. तो खेळत असतानाच ती तिथं आली. तो खेळण्यातच दंग होता. तो राज्य असणाऱ्या मुलाच्या अंगावरून ऊडी मारून अलीकडे आला आणि तेवढ्यात तीने हाक 🙋🏻 मारली. तो मात्र तिच्याकडे पाहत तिथेच थांबला. तीच त्याच्याजवळ आली आणि हात पुढे करत हलकीशी स्माईल देत त्याला म्हणाली, "Congratulations". त्यानेही लगेच तीच्या हातात हात दिला. काहीही न बोलता तो तसाच तीच्या डोळ्यांत पाहत थांबला होता. "बाकी खेळतोस ही तू छान", ती पुढे म्हणाली. तो "Thank you" म्हणणार, इतक्यात शाळा सुटल्याची बेल वाजली आणि त्याच्या मित्रांनी त्याला पटकन ओढत तिथून ते घेऊन गेले. तीही गालातल्या गालात हसत तिथून निघून गेली.

तो घरी जाण्यासाठी इतरांसारखी काही गडबड करत नसायचा. १-२ एसटी गेल्यानंतर तो निवांत जायचा. पण ती मात्र पहिल्याच एसटीत जायची आणि गर्दीतूनही लवकर जाऊन तीच्या मैत्रीणींना जागा पकडायची. तीचं गाव लांब होतं आणि ती सातवीत असल्याने दोन वर्षांत तीला गर्दीची सवयही झाली होती. त्यादिवशी नेहमीप्रमाणे तो आणि त्याचे मित्र स्टँडवर इमलीच्या लहान पुड्या चघळत थांबले होते. 

खिडकीतून तीने त्याला आवाज दिला आणि "जागा पकडलीये, चढ लवकर", असं म्हणाली. तो तिच्याकडे एकटक पाहत तसाच उभा राहिला होता. त्याला कारण तीच्या चेहऱ्याचा गोरापान रंग, पातळ आणि धनुष्यकृती भुवया, लांब आणि टोकदार नाक, थोडेसे कुरळे आणि भोरे केस आणि या सर्वांच्या जोडीला तीच्या चेहऱ्यावर पसरलेला मावळणाऱ्या सूर्याचा तांबडा प्रकाश यांमुळे ती अजूनच सुंदर दिसत होती. थोडक्यात तो भान हरपलाच होता. तितक्यात एसटी सुरू झाली आणि त्याचे मित्र म्हणाले, "ए यड्या .......च्या, चढ की लवकर. जागा पकडलीय की तीनं". एसटी निघण्याच्या अगोदर कसाबसा त्याने एसटीत प्रवेश मिळवला. तो तीच्या जवळ जाताच तीने दप्तर उचललं आणि आत सरकली. ती काही बोलणार, तितक्यात 
तोच म्हणाला; "Thank You". 
ती :- जागा पकडली म्हणून ?
तो :- नाही गं. मघाशी तू अभिनंदन केल्यानंतर      म्हणायचंच राहून गेलं.  
त्याचे दोन्ही मित्र त्यांच्या शेजारीच उभा राहिलेले होते. त्याचा एक मित्र दुसऱ्याला म्हणाला, "बघ अशी असतीय हुशार पोरांची हवा". बोलत बोलत त्याचं गाव कधी आलं, तेच दोघांच्याही लक्षात आलं नाही. इथं पुन्हा एकदा त्याचे मित्रच कामाला आले. "चला सर. उतरायचंय आपल्याला", असं त्याचे मित्र म्हणताच तो, ती आणि ते दोघे असे सगळेच हसायला लागले. तो एसटीतून उतरला. तीने टाटा केला आणि तीचा व एसटीचा त्या सोनेरी दिवसाच्या आठवणींसोबत पुढचा प्रवास सुरू झाला. 

भाग एक समाप्त. दुसरा आणि शेवटचा भाग दोन दिवसांनंतर. 

- प्रतिक दत्तलता होले

Thursday, 7 May 2020

असा साजरा केला मी महिला दिन

('आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची पोस्ट माझ्या फेसबुक अकाउंटला ८ मार्चला टाकलेली आहे. कोणाला वाचायची असल्यास तिथे जाऊन वाचू शकता किंवा मला मेसेज केला तर मी पाठवेन.)

प्रत्येकासाठी आपली आई खूप कष्ट करत असते आणि प्रेम करत असतेच. माझ्या आयुष्यात माझ्या आईशिवाय कोणतीही स्त्री शरीराने आणि मनानेही जवळ आलेली नाही. मी आज जो कोणी आहे आणि पुढे जो कोण होईल, ते फक्त माझ्या आईमुळेच. 

माझ्या आईचे आई-वडील शिक्षित नव्हते, त्यामुळे तिची नेमकी जन्मतारीख माहित नाही. त्यामुळे तीचा वाढदिवसही साजरा करता येत नाही. माझा भाऊ आणि माझ्याकडे पाहून ती दिवसभर राबत असते. मी महिला दिनी हॉस्टेलला होतो. प्रात्यक्षिक परीक्षेमुळे मला आई-वडील १० तारखेला असणाऱ्या धुलिवंदनासाठी मटन खायला बोलवत असूनही जाता आलं नाही. त्या रात्री महिला दिनाविषयी लिहायचं असल्याने मी रात्री लिहितच होतो. त्याचवेळी एक खूप छान कल्पना डोक्यात आली. तोपर्यंत सकाळ झालेलीच होती.

भैय्याला फोन केला आणि आईपासून लांब ये, असं सांगितलं. रात्री काय करायचं आहे, त्याची कल्पना त्याला दिली. योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आईला कळू द्यायचं नाही, हे सुद्धा आवर्जून सांगितलं. तसं दररोज आईला सकाळी एक कॉल (नाष्टा केला का विचारण्यासाठी आई कॉल करते) आणि रात्री एक कॉल, असं आमचं ठरलेलं असतं.

 त्यादिवशी मी फेसबुकला महिला दिनाच्या निमित्ताने लेख पाठवला आणि रात्रभर जागा असल्याने नाष्टा करून ७ वाजता फोन सायलेंट करून झोपी गेलो. १ वाजता उठलो तेव्हा आईचे २ मिस्ड कॉल्स पडले होते. तीच्याशी थोडं बोललो. अंघोळ केली आणि मेसमध्ये जेवायला गेलो. जेवण करून परत वर्तमानपत्र वाचत बसलो. संध्याकाळी चहा पिऊन खोलीवर आलो. रात्री नऊ वाजता भैय्याने कॉल केला आणि म्हणाला की, 'ऑनलाईन ये'.

मी भैय्याला काय सांगितलं होतं ? तर मी त्याला म्हणालो होतो, स्वीट होममधून गुलाबजाम घेऊन ये. तुझे पैसे खर्च कर, मी स्कॉलरशिप आली की तुला पाठवतो. माझ्या आईला पाकातले गुलाबजाम फार आवडतात. मी व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला, नेहमीप्रमाणे अगोदर जेवला का ? वगैरे विचारलं. भैय्या गुलाबजाम घेऊन आला आणि आईला सांगितलं, "तुझा वाढदिवस कधी असतो, ते माहित नाही. म्हणून महिला दिनाला तुला खूष करायचं होतं." भैय्याने एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने आईला गुलाबजाम चारलं. आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती दरवेळी फक्त माझी पप्पी घेत असते, पण त्याक्षणी तीने भैय्याची खूप दिवसांतून पप्पी घेतली. नंतर तीने वडीलांना आणि भैय्यालाही गुलाबजाम चारलं. हे सगळं दृश्य लाईव्ह पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आलं नसतं, तरच नवल !!!😫😅  मी कॉल कट केला. (तीला घरी असताना चिकटून झोपायचो. म्हणून तीची आठवण येऊ नये, यासाठी तीच्याच जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी माझ्याबरोबर घेऊन गेलोय.) गोधडी चेहऱ्यावर घेऊन मनमोकळेपणाने रडत बसलो. अर्थात ते आनंदाश्रू होते, हे वेगळं सांगायला नकोच. 

(हा फोटो बांग्लादेशची राजधानी ढाका शहरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रीचा आणि तीच्या भविष्याचा आहे. स्त्रोत - गुगल)

थोड्या वेळाने तात्या (माझा ज्युनिअर आणि रूममेट) आला आणि म्हणाला, चल चहा प्यायला. वातावरणात थोडीशी थंडी होतीच. त्याला सगळा प्रसंग सांगत चहा प्यायला निघालो. शेवटी तोही रडायला लागला... दोघेही आईपासून दूर होतो, पण दोघांमध्ये आई दूर असण्याच्या अंतराचा फरक होता. माझी आई ३-४ तासांच्या अंतरावर होती. त्याच्या आईची दूरी मोजायला आतापर्यंत तरी कोणतंच परिमाण नाही. कारण दुसरीत असतानाच त्याची आई वारली होती...

- प्रतिक दत्तलता होले

Monday, 4 May 2020

लग्नाअगोदर मैत्री असणं महत्वाचं...

ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही लग्न करणार आहात. आपलं उर्वरित संपूर्ण आयुष्य सोबत घालवणार आहात. त्याच्याशी अगोदर चांगली मैत्री करा, एकमेकांना समजून घ्या. - आचार्य चाणक्य

लग्न म्हणजे फक्त सगळे करतात म्हणून वय झाल्यानंतर करण्याची एक गोष्ट नसून ती खूप महत्वाची जबाबदारी आहे, हे मुलगा-मुलगी दोघांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. लग्नानंतर संसार नावाचं पर्व सुरू होतं. त्या संसारामध्ये दोघांच्या भविष्याची सोनेरी स्वप्ने, होणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य अशा जबाबदाऱ्या, आई-वडील अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

संसार म्हणजे सायकल असते, असं म्हटलं जातं. त्यातील नवरा व बायको यांचे नाते पेडल (pedal) व चेन (chain) यांच्यासारखे असते. पेडल मारल्याशिवाय चेन फिरत नाही आणि चेन पडली तर नुसतं पेडल मारून काही सायकल पळत नाही. दोघांनाही एकमेकांना साथ दिल्याशिवाय काम करता येत नाही; मग ती सायकल असो नाहीतर संसार.

आपल्या समाजात लग्न जमवण्याची पद्धतच मुळात खूप विचित्र आणि भयंकर होती आणि आहे. आपल्या आई-वडील आणि आजी-आजोबांच्या वेळी तर मुलगा आणि मुलीला विचारत सुद्धा नसायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जन्म झाल्यावर लगेचच एकमेकांना वचन पण देऊन टाकायचे. हे वरकरणी जरी गंमतीशीर वाटत असलं तरी खूप भयंकर आणि नुकसानकारक आहे. आपल्या आजीला विचारा की, तरूणपणी आजोबा आजीला किती शिवीगाळ, मारहाण करायचे ते. 

आता लग्नाच्या वेळी मुलाचं वय वर्षे साधारण २५ ते २७ आणि मुलीचं २० ते २३ च्या दरम्यान असतं. म्हणजे ६० वर्षे आयुर्मान धरलं तरी पुढची ३५-४० वर्ष दोघांना बरोबर घालवायची असतात. मग अगोदर नाव सुद्धा माहित नसलेल्या व्यक्तीबरोबर फक्त बाह्यरूप आणि आर्थिक परिस्थिती पाहून इतकी वर्ष सोबत कशी घालवणार ? आर्थिक परिस्थिती गरजेची आहेच, नाही असं नाही. पण फक्त आर्थिक परिस्थितीमुळे व्यवस्थित संसार नाही करता येत. जे मुलं-मुली बाहेर हॉस्टेलला राहतात, त्यांना हे व्यवस्थित समजेल. जर एका खोलीमध्ये राहणाऱ्यांचे विचार, स्वभाव पटत नसेल तर रहायला किती अवघड होतं. तिथे तर फक्त काही महिने किंवा वर्षे रहायचं असतं, त्यांच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायचं नसतं. मग विचार करा की, ज्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, आवड-निवड माहित नसेल त्याच्याबरोबर इतकी वर्षे कसं राहणार ?

 मला माहित आहे की, प्रत्येकाचे आपल्या आई-वडीलांवर प्रेम असते. त्यामुळे त्यांना दुखावून नाही चालणार. पण ते घेतील तो निर्णय बरोबरच असेल, याची खात्री कशावरून ? त्यांना खूप अनुभव असतो. पण प्रत्येकवेळी अनुभवच उपयोगी पडत नाही. महत्वाचं म्हणजे, तेही चुकू शकतातच की ? लग्न म्हणजे खूप मोठा निर्णय आहे, तो चुकल्यानंतर परत निभावता येत नाही. कारण अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडे पटत नसेल तर परस्परसंमतीने घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करता येत नाही. जर नवरा-बायको यांचे संबंध बरोबर नसतील तर ओढूनताणून ते नातं टिकवण्यात काय अर्थ आहे ?

मी अशी कितीतरी जोडपी पाहिलीत की, ज्यांचा एकमेकांवर कसलाच विश्वास आणि परस्परांमध्ये संवाद नसतो. नवरा-बायको दोघेही आपापल्या मनाप्रमाणे वागत असतात. मग ना त्यांना संसार व्यवस्थित करता येतो, ना त्यांची मुलं व्यवस्थित नोकरी-धंदा करत असतात. नवरा-बायको यांच्या संबंधाचा परिणाम आपोआप मुलांवरही पडत असतो. मग ती मुलं वाईट मार्गाला लागतात, हे वेगळं सांगायला नकोच. याउलट मी अशीही कितीतरी जोडपी पाहिलीत की, जे एकमेकांना विश्वासात घेऊन वाटचाल करत असतात. सुरूवातीला त्यांच्याजवळ काहीही नसताना आता ते सर्व भौतिक सुखसोयींनी समृद्ध आहेत. त्यांची मुलंही साहजिकच परस्पर संवादामुळे सगळं आई-वडीलांना विश्वासात घेऊन करत असतात आणि यशस्वी सुद्धा होतात. 

आता प्रश्न हा उभा राहतो की, हे सगळं तर खरं आहे. पण आई-वडीलांना कसं समजावायचं ? त्यासाठी सर्वांत महत्वाचं म्हणजे, मुलगा-मुलगी दोघांनाही पूर्णपणे आर्थिक स्वावलंबी व्हावं लागेल. जर तुमचं एकमेकांवर प्रेम असेल तर कुटुंबियांना विश्वासात घेऊन ते व्यवस्थित समजावून सांगा. जात-धर्म, कुळ, गोत्र या सगळ्या मानवनिर्मीत गोष्टी आहेत, हे त्यांना सांगावं लागेल. तेव्हाच घरच्यांना तुमच्यावर विश्वास येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जर अरेंज पद्धतीने लग्न करायचं असेल तर लग्नाअगोदर काहीवेळ (ज्याला लीव्ह इन म्हणतात) एकत्र घालवा. एकमेकांचे विचार, स्वभाव जाणून घ्या. जर पटत असेल तर ठीक नाहीतर कुटुंबियांना तसं स्पष्ट सांगा. जर असं झालं नाही तर मग मात्र पुढची वाटचाल खूप कठीण आहे. 

लग्न जमवताना कुंडलीतील ३६ गुण जुळताहेत का ? हे पाहण्याऐवजी ३६ प्रश्न तयार करून एकमेकांच्या आवडी-निवडी, विचार, स्वभाव जुळताहेत का ? हे पाहणं खूप महत्वाचं आहे, असं मला वाटतं. उदाहरण म्हणून सांगतो, माझे एक मार्गदर्शक मित्र आहेत. त्यांचे एका मुलीवर प्रेम होते. ५वी ते १०वी ते एका वर्गात होते आणि दहावीपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. ते दोघेही सध्या STI आहेत आणि MPSC ची पूर्व, मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखत दिलेली आहे. निकाल अजून यायचाय, पण त्याअगोदर दोघांनी आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन लग्नाला होकार मिळवला आहे. 

(एकमेकांचा हातात हात घेऊन, एकमेकांना सावरत, प्रेमाची साथ देऊन असंच चालता आलं तर रस्त्यात कितीही काटे, खड्डे, दगड असतील तरीही खडतर प्रवास करून सुखाच्या सागराला जाऊन मिळता येईल.)

शेवटी एवढंच सांगतो की, जर नवरा-बायको दोघांची एकमेकांना साथ असेल तर वाळवंटातही हिरवं शिवार फुलवता येतं. याउलट जर दोघे एकत्र नसतील तर हिरव्या शिवाराचं वाळवंट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही.

- प्रतिक दत्तलता होले