Showing posts with label वैयक्तिक. Show all posts
Showing posts with label वैयक्तिक. Show all posts

Thursday, 7 May 2020

असा साजरा केला मी महिला दिन

('आंतरराष्ट्रीय महिला दिना'ची पोस्ट माझ्या फेसबुक अकाउंटला ८ मार्चला टाकलेली आहे. कोणाला वाचायची असल्यास तिथे जाऊन वाचू शकता किंवा मला मेसेज केला तर मी पाठवेन.)

प्रत्येकासाठी आपली आई खूप कष्ट करत असते आणि प्रेम करत असतेच. माझ्या आयुष्यात माझ्या आईशिवाय कोणतीही स्त्री शरीराने आणि मनानेही जवळ आलेली नाही. मी आज जो कोणी आहे आणि पुढे जो कोण होईल, ते फक्त माझ्या आईमुळेच. 

माझ्या आईचे आई-वडील शिक्षित नव्हते, त्यामुळे तिची नेमकी जन्मतारीख माहित नाही. त्यामुळे तीचा वाढदिवसही साजरा करता येत नाही. माझा भाऊ आणि माझ्याकडे पाहून ती दिवसभर राबत असते. मी महिला दिनी हॉस्टेलला होतो. प्रात्यक्षिक परीक्षेमुळे मला आई-वडील १० तारखेला असणाऱ्या धुलिवंदनासाठी मटन खायला बोलवत असूनही जाता आलं नाही. त्या रात्री महिला दिनाविषयी लिहायचं असल्याने मी रात्री लिहितच होतो. त्याचवेळी एक खूप छान कल्पना डोक्यात आली. तोपर्यंत सकाळ झालेलीच होती.

भैय्याला फोन केला आणि आईपासून लांब ये, असं सांगितलं. रात्री काय करायचं आहे, त्याची कल्पना त्याला दिली. योजना प्रत्यक्षात येईपर्यंत आईला कळू द्यायचं नाही, हे सुद्धा आवर्जून सांगितलं. तसं दररोज आईला सकाळी एक कॉल (नाष्टा केला का विचारण्यासाठी आई कॉल करते) आणि रात्री एक कॉल, असं आमचं ठरलेलं असतं.

 त्यादिवशी मी फेसबुकला महिला दिनाच्या निमित्ताने लेख पाठवला आणि रात्रभर जागा असल्याने नाष्टा करून ७ वाजता फोन सायलेंट करून झोपी गेलो. १ वाजता उठलो तेव्हा आईचे २ मिस्ड कॉल्स पडले होते. तीच्याशी थोडं बोललो. अंघोळ केली आणि मेसमध्ये जेवायला गेलो. जेवण करून परत वर्तमानपत्र वाचत बसलो. संध्याकाळी चहा पिऊन खोलीवर आलो. रात्री नऊ वाजता भैय्याने कॉल केला आणि म्हणाला की, 'ऑनलाईन ये'.

मी भैय्याला काय सांगितलं होतं ? तर मी त्याला म्हणालो होतो, स्वीट होममधून गुलाबजाम घेऊन ये. तुझे पैसे खर्च कर, मी स्कॉलरशिप आली की तुला पाठवतो. माझ्या आईला पाकातले गुलाबजाम फार आवडतात. मी व्हिडिओ कॉल रिसीव्ह केला, नेहमीप्रमाणे अगोदर जेवला का ? वगैरे विचारलं. भैय्या गुलाबजाम घेऊन आला आणि आईला सांगितलं, "तुझा वाढदिवस कधी असतो, ते माहित नाही. म्हणून महिला दिनाला तुला खूष करायचं होतं." भैय्याने एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने आईला गुलाबजाम चारलं. आईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ती दरवेळी फक्त माझी पप्पी घेत असते, पण त्याक्षणी तीने भैय्याची खूप दिवसांतून पप्पी घेतली. नंतर तीने वडीलांना आणि भैय्यालाही गुलाबजाम चारलं. हे सगळं दृश्य लाईव्ह पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आलं नसतं, तरच नवल !!!😫😅  मी कॉल कट केला. (तीला घरी असताना चिकटून झोपायचो. म्हणून तीची आठवण येऊ नये, यासाठी तीच्याच जुन्या साड्यांची शिवलेली गोधडी माझ्याबरोबर घेऊन गेलोय.) गोधडी चेहऱ्यावर घेऊन मनमोकळेपणाने रडत बसलो. अर्थात ते आनंदाश्रू होते, हे वेगळं सांगायला नकोच. 

(हा फोटो बांग्लादेशची राजधानी ढाका शहरातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रीचा आणि तीच्या भविष्याचा आहे. स्त्रोत - गुगल)

थोड्या वेळाने तात्या (माझा ज्युनिअर आणि रूममेट) आला आणि म्हणाला, चल चहा प्यायला. वातावरणात थोडीशी थंडी होतीच. त्याला सगळा प्रसंग सांगत चहा प्यायला निघालो. शेवटी तोही रडायला लागला... दोघेही आईपासून दूर होतो, पण दोघांमध्ये आई दूर असण्याच्या अंतराचा फरक होता. माझी आई ३-४ तासांच्या अंतरावर होती. त्याच्या आईची दूरी मोजायला आतापर्यंत तरी कोणतंच परिमाण नाही. कारण दुसरीत असतानाच त्याची आई वारली होती...

- प्रतिक दत्तलता होले