[ज्यांनी माझा डॉ. ली वेनलियांग आणि लोकशाहीची आवश्यकता हा लेख वाचला नाही, त्यांनी अगोदर तो वाचा. म्हणजे या लेखाची गरज लक्षात येईल. माझ्या फेसबुक अकाउंटला २३ मार्च २०२० ला मी तो टाकलेला आहे.]
तुम्हाला एखाद्या नेत्याची किंवा व्यक्तीची कार्यपद्धती, त्याचे कार्य आवडत असेल; तर त्याच्या एखाद्या निर्णयाला समर्थन देणं ठीक आहे. पण सरसकटपणे त्याच्या प्रत्येक निर्णयाला समर्थन देणं, हे चुकीचं आहे. त्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत केलेलं एक भाषण आहे, ते सांगून ब्लॉगला सुरूवात करूया. स्वातंत्र्याला दुसरा धोका लोकांच्या व्यक्तीपूजेतून निर्माण झाला आहे, असे सांगून त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याच्या मताची सभागृहाला आठवण करून दिली. त्याने लोकशाहीच्या संरक्षकांस असा इशारा दिला आहे की; No person, however great, is greater than the country. एखादा माणूस कितीही महान असला तरी त्याच्या चरणावर त्यांनी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये किंवा आपल्या संस्थेचा नाश करण्यास तो समर्थ होईल, एवढी मोठी सत्ता त्याच्या स्वाधीन करू नये. देशात प्रचलित असणाऱ्या आंधळ्या आणि निर्बुद्ध व्यक्तीूजेविरूद्ध इशारा देताना बाबासाहेब म्हटले की, "ज्या महान लोकांनी आयुष्यभर देशाची सेवा केली, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगण्यात काही गैर नाही. परंतु त्या कृतज्ञतेस काही मर्यादा असते. आयरिश देशभक्त ओकानेल याने म्हटल्याप्रमाणे, आपल्या आत्मप्रतिष्ठेचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही; आपल्या शीलाचा (शरीरसंबंध ठेवणे) बळी देऊन कोणीही स्री कृतज्ञ राहू शकत नाही आणि आपल्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही. दुसऱ्या कोणत्याही देशांपेक्षा भारतात सावधगिरी बाळगायला हवी. कारण भारतामध्ये राजकारणात व्यक्तीपूजेचा इतका जबरदस्त परिणाम होतो की, तसा परिणाम जगातील कोणत्याही दुसऱ्या देशाच्या राजकारणात होत नाही. धर्मामध्ये भक्ती ही आत्म्याला मुक्ती मिळवण्याचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती अथवा व्यक्तीपूजा हा अधोगतीचा आणि शेवटी हुकूमशाहीचा निश्चित मार्ग आहे म्हणून समजावे.
बाबासाहेबांनी हे फक्त राजकारणाच्या बाबतीत सांगितलं होतं, पण ते सर्वच क्षेत्रांत लागू होतं. मग ते क्रिकेटपटू, किर्तनकार, अभिनेते, नेते आणि त्यांचे अनुयायी असो किंवा मग धार्मिक पुढारी (पुजारी, मौलवी, पोप वगैरे) असो.
मागच्या ब्लॉग मध्ये जो अक्षय कुमार, रतन टाटा यांचा उल्लेख होता, त्याबाबतीत काहीजण म्हणाले की; ब्लॉग मस्त होता, पण ते काही मला पटलं नाही. आता त्याचं कारण सांगतो. नरेंद्र मोदी हे व्यक्ती म्हणून कसे का असेनात, त्याचं आपल्याला काय करायचंय! मग त्यांनी चहा विकलेला असो, संन्यासी होण्यासाठी बायकोला सोडलेलं असो किंवा रात्रंदिवस काम करणं असो. आपल्याला पंतप्रधान म्हणून ते त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का, हे महत्वाचं आहे. मग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काही का करेनात! हिटलर त्याच्या आयुष्यात अत्यंत शिस्तप्रिय, दारू-स्री यांच्या आहारी न जाणारा तर विन्स्टन चर्चिल (त्याचवेळचे इंग्लंडचे पंतप्रधान) अत्यंत आळशी, सतत दारू पिणारे होते. पण काय झालं, इंग्लंड महायुद्ध जिंकलं आणि महासत्ता म्हणून उदयास आलं. तर हिटलर महायुद्ध हरला आणि त्याने आत्महत्या केली. अक्षय कुमारने मोदींच्या घेतलेल्या अराजकीय मुलाखतीतून मोदी व्यक्ती म्हणून कसे चांगले आहेत, हे दाखवलं (तेही निवडणूकीवेळी). त्यापेक्षा ते पंतप्रधान म्हणून कसे चांगले आहेत, हे दाखवायला पाहिजे होतं.
राज्यघटना लिहताना बाबासाहेब आजारी होते. त्यांच्या पायाचे स्नायू खूप दुखत होते. त्यांचे डोळेही खराब झाले होते. अधूनमधून ते मुंबईला येऊन उपचार करत होते, पण त्याचा काही फरक पडत नव्हता. महत्वाचं म्हणजे, राज्यघटना लिहिण्याचा भार त्यांच्या एकट्यावरच पडला होता. कारण इतर सहा सदस्यांपैकी एकाचा मृत्यू झाला, दुसऱ्याने राजीनामा दिला, तिसरे अमेरिकेला गेले, चौथे संस्थानिकांसंबंधीच्या कामात गुंतून राहिले आणि उर्वरित दोघे प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीपासून दूर होते. त्यामुळे बाबासाहेब व त्यांचे कार्यवाह असे दोघेच लेखन समितीच्या बैठकीला उपस्थित असत. पण जर राज्यघटनाच जर व्यवस्थित नसती, तर या सांगण्याला काही अर्थ राहिला असता का ?
दुसरं म्हणजे, विधानसभा निवडणूकीवेळी सुद्धा ८० वर्षांचा योद्धा एवढ्या पावसात भिजतोय म्हणून डंका पिटवला गेला. पण त्यांनी काहीही केलं, तरी महाराष्ट्राच्या विकासावर ते काय बोलतात, ते महत्वाचं नाही का ? नाहीतर मग निवृत्ती स्विकारून घरी बसावं. जसं अमेरिकेत माजी राष्ट्राध्यक्ष राजकारणात लक्ष घालत नाहीत तसं. मात्र काल परवापर्यंत पवारांचं कौतुक करणाऱ्यांची मोदींच्या नावाने आगपाखड चालू आहे, तर कालपर्यंत पवारांवर हल्लाबोल करणारे आज मोदींच्या सोबत उभे आहेत. दिवे लावायला लावून मोदी आपल्याला मूर्ख बनवत आहेत, असं वाटणाऱ्यांना राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रात 'माझ्याकडे एकही गाडी नाही' असं सांगत राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवडून आलेले जाणते राजेही आपल्याला मूर्खच समजत होते की काय!!! हा प्रश्न का पडला नाही? -दौलत नाईकवाडे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या राज्यसभेवरील नियुक्तीवर टीका करणारे साहेब अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचीट देणाऱ्या परमबिर सिंग यांच्या मुंबई पोलिस आयुक्तपदी केलेल्या नियुक्तीवर अगदी मूग गिळून का गप्प बसले ? आता काहीजण म्हणतील की, मी फक्त दोघांबद्दलच बोलतोय. अहो पण महाराष्ट्र आणि देशाचं राजकारण या दोघांच्या भोवतीच फिरतंय. महत्वाचं म्हणजे, मी मांडलेल्या मुद्द्यांतील कोणता मुद्दा चुकीचा आहे का ? हा ब्लॉग मी काल रात्री न झोपता लिहिला आहे. पण हे सांगण्यापेक्षा या लेखात मजकूर काय आहे, हे महत्वाचं नाही का ?
हीच गोष्ट इंदुरीकर यांच्यासारखे किर्तनकार, धोनी आणि सलमान यांसारख्यांचे चाहते, यांनाही लागू होते. कारण हेच नंतर प्रत्यक्ष राजकारणात येतात (गौतम गंभीर, सनी देओल) नाहीतर मग एखाद्या पक्षाला समर्थन देतात. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं मी समजू शकतो, त्यात त्यांचा व्यक्तिगत फायदा असतो. पण सामान्य नागरिकांनी याचा विचार करायला हवा.
(कोरोनाची परिस्थिती नीट हाताळली नाही म्हणून प्रगल्भ लोकशाही म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेतील लोक ट्रम्पवर टीका करत आहेत. आपल्याकडे म्हणतात ही वेळ नाही, टीका करायची)
त्याच भाषणात बाबासाहेब पुढे म्हणतात :- 'भारतीय लोकशाहीचे संरक्षण करताना भारतीयांनी एक गोष्ट केली पाहिजे ती ही की, त्यांनी राजकीय लोकशाहीमुळे संतुष्ट राहू नये. राजकीय लोकशाहीचे त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीत रूपांतर केले पाहिजे. राजकीय लोकशाही ही जर सामाजिक लोकशाहीवर अधिष्ठित केली नाही, तर ती टिकूच शकणार नाही. भारतीय नागरिकांनी एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती ही की, भारतात दोन गोष्टींचा अभाव आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे सामाजिक समता आणि आर्थिक समता. आपल्या आवेशयुक्त भाषणात देशाला धोक्याची सूचना देताना बाबासाहेब म्हणाले, "२६ जानेवारी १९५० रोजी आम्हांला राजकीय समता लाभेल. पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमता राहील. जर ही विसंगती आपण शक्यतो लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही, तर ज्यांना विषमतेची आच लागलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्धस्त करून टाकल्यावाचून राहणार नाहीत."
इथं एक गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे बाबासाहेबांना समानता नाही, समता अभिप्रेत आहे. समानता म्हणजे सर्व सोयीसुविधा सर्वांना समान मिळणं. समता म्हणजे दोन वेगळ्या घटकांना कमी-अधिक प्रमाणात सोयीसुविधा देऊन अंतिमतः दोघांना समान पातळीवर नेणं. भारतात बऱ्याच वर्षांपासून अस्पृश्य आणि अल्पसंख्यांक समुदायांवर अन्याय केला गेला, त्यांना जगण्याचे मुलभूत अधिकार सुद्धा दिले गेले नाहीत. म्हणून मग ते दूर करण्यासाठी त्यांना शासन आणि प्रशासनात आरक्षण, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली गेली. पण तरीही आता खासगी किंवा सरकारी दोन्हीही ठिकाणी उच्चदर्जाची पदं ही बहुसंख्येने ब्राह्मणांकडेच आहेत. दुसरं म्हणजे, आर्थिक समता. गरीब आणि श्रीमंत म्हणून जन्माला येणं, त्यावरून प्रत्येकाला व्यवसायाच्या तसेच प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात. ते होऊ नये, गरीबांनाही पुढे जाता यावं म्हणून श्रीमंतांकडून कर गोळा करून गरीबांना अन्न, पाणी, शिक्षण, रोजगार यासाठी उपलब्ध करून देऊन गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी मिटवण्याचं काम करणं ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणून बाबासाहेबांनी असा इशारा दिला होता की, लवकरात लवकर ही दरी मिटवली नाही तर लोकशाही टिकणार नाही. मागील १०-१५ वर्षांच्या काळात ही गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी वाढलेली आहे. व्यक्तीपूजेचं भूत कित्येकांच्या मानेवर आरूढ झालेलं आहे. लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ असणारे कायदेमंडळ (लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद), कार्यकारी मंडळ (IAS, IPS, IRS), न्यायपालिका आणि वृत्तसंस्था हे चारही स्तंभ डळमळीत झाले आहेत. त्यामुळे भारतात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीच नांदत आहे. म्हणून आमचे मित्र रामेश्वर कुटे म्हणतात - नागरिक हो! जोपर्यंत मत, कर व संविधानाची किंमत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत प्रत्येक राजकीय पक्ष तुमचे शोषणच करील.
बाबासाहेब त्यामुळे म्हणतात - खरोखर जर या राज्यघटनेप्रमाणे गोष्टी सुरळीत चालल्या नाहीत तर त्याला कारण आमच्या राज्यघटनेतील दोष नसून, मनुष्य समाजातील अधमपणा हाच असेल असे मला म्हणावे लागेल! त्याच काळी बाबासाहेब विद्यार्थ्यांना असं म्हणतात की, कोणत्याही समाजाची प्रवृत्ती ही तो समाज शिक्षणात किती पुढे जातो यावर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी आपली दृष्टी व्यापक केली पाहिजे. लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते सोडविण्याचे सामर्थ्य आणि विचारशक्ती यांचा त्यांनी विकास केला पाहिजे.
माझ्या मते, अशक्त शरीराची नाही तर अशक्त विचारांची माणसं गुलामगिरीला बळी पडतात. बलात्काऱ्यांना फाशी, आरोपींचा एन्काउंटर, पोलिसांच्या मारहाणीचं समर्थन, धर्माकडे जास्त ओढा, राष्ट्रीय एकतेचा चुकीचा अर्थ लावणे ही सर्व अशक्त विचारसरणीची प्रतीकं आहेत. हे सगळे शॉर्टकट्स आहेत. पण दूरदृष्टीने विचार करून योग्य तेच स्विकारायला हवं. त्यामुळे महापुरूषांना वाचून, इतरही वाचन वाढवून, वर्तमानपत्र वाचून आपली विचारसरणी प्रगल्भ करायला हवी.
- प्रतिक दत्तलता होले
NAME:- NITESH KHANDARE.
ReplyDeleteThanks for sharing this block.
Its needs for the new generation.
Excellent writing's each words are very important nd valuable. Easy to understand. Thank you!.
nd all the best for ur all incoming futures.
विद्यार्थांनी आपली दृष्टी व्यापक केली पाहिजे, समाजाला जे प्रश्न भेडसवतात, त्यांच निराकारण करणारा मार्ग शोधायला हवा,, त्यासाठी शिक्षणाचा खरा अर्थ कळण गरजेच आहे.
ReplyDeleteबाकी आपला लेख अप्रतिम आणी विचार करायला लावणारा तर आहेच..
बहुसंख्य समाज एखाद्या व्यक्तिचा पुजक का होतो, त्याला देव का केले जाते विचार करायला हवा..
त्या व्यक्तिचे नैतिक मुल्य घ्यायला हवेत नाही की आपले घाण ठेवायला..
बाकी आपण रात्रभर जागुन जो हा अट्टहास केला त्याबद्दल आपल कौतुकच..