Monday, 4 May 2020

लग्नाअगोदर मैत्री असणं महत्वाचं...

ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही लग्न करणार आहात. आपलं उर्वरित संपूर्ण आयुष्य सोबत घालवणार आहात. त्याच्याशी अगोदर चांगली मैत्री करा, एकमेकांना समजून घ्या. - आचार्य चाणक्य

लग्न म्हणजे फक्त सगळे करतात म्हणून वय झाल्यानंतर करण्याची एक गोष्ट नसून ती खूप महत्वाची जबाबदारी आहे, हे मुलगा-मुलगी दोघांनीही लक्षात घेणं गरजेचं आहे. लग्नानंतर संसार नावाचं पर्व सुरू होतं. त्या संसारामध्ये दोघांच्या भविष्याची सोनेरी स्वप्ने, होणाऱ्या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य अशा जबाबदाऱ्या, आई-वडील अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

संसार म्हणजे सायकल असते, असं म्हटलं जातं. त्यातील नवरा व बायको यांचे नाते पेडल (pedal) व चेन (chain) यांच्यासारखे असते. पेडल मारल्याशिवाय चेन फिरत नाही आणि चेन पडली तर नुसतं पेडल मारून काही सायकल पळत नाही. दोघांनाही एकमेकांना साथ दिल्याशिवाय काम करता येत नाही; मग ती सायकल असो नाहीतर संसार.

आपल्या समाजात लग्न जमवण्याची पद्धतच मुळात खूप विचित्र आणि भयंकर होती आणि आहे. आपल्या आई-वडील आणि आजी-आजोबांच्या वेळी तर मुलगा आणि मुलीला विचारत सुद्धा नसायचे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जन्म झाल्यावर लगेचच एकमेकांना वचन पण देऊन टाकायचे. हे वरकरणी जरी गंमतीशीर वाटत असलं तरी खूप भयंकर आणि नुकसानकारक आहे. आपल्या आजीला विचारा की, तरूणपणी आजोबा आजीला किती शिवीगाळ, मारहाण करायचे ते. 

आता लग्नाच्या वेळी मुलाचं वय वर्षे साधारण २५ ते २७ आणि मुलीचं २० ते २३ च्या दरम्यान असतं. म्हणजे ६० वर्षे आयुर्मान धरलं तरी पुढची ३५-४० वर्ष दोघांना बरोबर घालवायची असतात. मग अगोदर नाव सुद्धा माहित नसलेल्या व्यक्तीबरोबर फक्त बाह्यरूप आणि आर्थिक परिस्थिती पाहून इतकी वर्ष सोबत कशी घालवणार ? आर्थिक परिस्थिती गरजेची आहेच, नाही असं नाही. पण फक्त आर्थिक परिस्थितीमुळे व्यवस्थित संसार नाही करता येत. जे मुलं-मुली बाहेर हॉस्टेलला राहतात, त्यांना हे व्यवस्थित समजेल. जर एका खोलीमध्ये राहणाऱ्यांचे विचार, स्वभाव पटत नसेल तर रहायला किती अवघड होतं. तिथे तर फक्त काही महिने किंवा वर्षे रहायचं असतं, त्यांच्याबरोबर अख्खं आयुष्य घालवायचं नसतं. मग विचार करा की, ज्या व्यक्तीचे विचार, स्वभाव, आवड-निवड माहित नसेल त्याच्याबरोबर इतकी वर्षे कसं राहणार ?

 मला माहित आहे की, प्रत्येकाचे आपल्या आई-वडीलांवर प्रेम असते. त्यामुळे त्यांना दुखावून नाही चालणार. पण ते घेतील तो निर्णय बरोबरच असेल, याची खात्री कशावरून ? त्यांना खूप अनुभव असतो. पण प्रत्येकवेळी अनुभवच उपयोगी पडत नाही. महत्वाचं म्हणजे, तेही चुकू शकतातच की ? लग्न म्हणजे खूप मोठा निर्णय आहे, तो चुकल्यानंतर परत निभावता येत नाही. कारण अमेरिका, जर्मनी, फ्रान्स या पाश्चात्त्य देशांप्रमाणे आपल्याकडे पटत नसेल तर परस्परसंमतीने घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करता येत नाही. जर नवरा-बायको यांचे संबंध बरोबर नसतील तर ओढूनताणून ते नातं टिकवण्यात काय अर्थ आहे ?

मी अशी कितीतरी जोडपी पाहिलीत की, ज्यांचा एकमेकांवर कसलाच विश्वास आणि परस्परांमध्ये संवाद नसतो. नवरा-बायको दोघेही आपापल्या मनाप्रमाणे वागत असतात. मग ना त्यांना संसार व्यवस्थित करता येतो, ना त्यांची मुलं व्यवस्थित नोकरी-धंदा करत असतात. नवरा-बायको यांच्या संबंधाचा परिणाम आपोआप मुलांवरही पडत असतो. मग ती मुलं वाईट मार्गाला लागतात, हे वेगळं सांगायला नकोच. याउलट मी अशीही कितीतरी जोडपी पाहिलीत की, जे एकमेकांना विश्वासात घेऊन वाटचाल करत असतात. सुरूवातीला त्यांच्याजवळ काहीही नसताना आता ते सर्व भौतिक सुखसोयींनी समृद्ध आहेत. त्यांची मुलंही साहजिकच परस्पर संवादामुळे सगळं आई-वडीलांना विश्वासात घेऊन करत असतात आणि यशस्वी सुद्धा होतात. 

आता प्रश्न हा उभा राहतो की, हे सगळं तर खरं आहे. पण आई-वडीलांना कसं समजावायचं ? त्यासाठी सर्वांत महत्वाचं म्हणजे, मुलगा-मुलगी दोघांनाही पूर्णपणे आर्थिक स्वावलंबी व्हावं लागेल. जर तुमचं एकमेकांवर प्रेम असेल तर कुटुंबियांना विश्वासात घेऊन ते व्यवस्थित समजावून सांगा. जात-धर्म, कुळ, गोत्र या सगळ्या मानवनिर्मीत गोष्टी आहेत, हे त्यांना सांगावं लागेल. तेव्हाच घरच्यांना तुमच्यावर विश्वास येईल. दुसरी गोष्ट म्हणजे जर अरेंज पद्धतीने लग्न करायचं असेल तर लग्नाअगोदर काहीवेळ (ज्याला लीव्ह इन म्हणतात) एकत्र घालवा. एकमेकांचे विचार, स्वभाव जाणून घ्या. जर पटत असेल तर ठीक नाहीतर कुटुंबियांना तसं स्पष्ट सांगा. जर असं झालं नाही तर मग मात्र पुढची वाटचाल खूप कठीण आहे. 

लग्न जमवताना कुंडलीतील ३६ गुण जुळताहेत का ? हे पाहण्याऐवजी ३६ प्रश्न तयार करून एकमेकांच्या आवडी-निवडी, विचार, स्वभाव जुळताहेत का ? हे पाहणं खूप महत्वाचं आहे, असं मला वाटतं. उदाहरण म्हणून सांगतो, माझे एक मार्गदर्शक मित्र आहेत. त्यांचे एका मुलीवर प्रेम होते. ५वी ते १०वी ते एका वर्गात होते आणि दहावीपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. ते दोघेही सध्या STI आहेत आणि MPSC ची पूर्व, मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखत दिलेली आहे. निकाल अजून यायचाय, पण त्याअगोदर दोघांनी आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊन लग्नाला होकार मिळवला आहे. 

(एकमेकांचा हातात हात घेऊन, एकमेकांना सावरत, प्रेमाची साथ देऊन असंच चालता आलं तर रस्त्यात कितीही काटे, खड्डे, दगड असतील तरीही खडतर प्रवास करून सुखाच्या सागराला जाऊन मिळता येईल.)

शेवटी एवढंच सांगतो की, जर नवरा-बायको दोघांची एकमेकांना साथ असेल तर वाळवंटातही हिरवं शिवार फुलवता येतं. याउलट जर दोघे एकत्र नसतील तर हिरव्या शिवाराचं वाळवंट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही.

- प्रतिक दत्तलता होले

14 comments:

  1. At the age of 18-19 the maturity that you have is insane .Bravo👌👌👏👏.Keep sharing good things.I am impressed with the simple language.

    ReplyDelete
  2. Khupch chaan...

    Sahamat ahe mi tujya vichranashi

    ReplyDelete
  3. Nice Pratik...Good Writing❤👍

    ReplyDelete
  4. मित्रा अतिशय सुंदर लेखन 👍

    ReplyDelete
  5. अतिशय सोप्या भाषेत खूप मार्मिक लेख लिहला होले सर..तुमचे लेख वाचणे म्हणजे जर वेळेस एक सुखद अनुभव असतो.तो ही खूप अर्थपूर्ण ....

    ReplyDelete
  6. तु म्हणालास बघ की एका खोलीमध्ये राहणाऱ्यांचे विचार,स्वभाव पटत नसेल तर खुप आवडत..हे अगदी बरोबर आहे बघ
    .....कुणाल खताळ

    ReplyDelete
  7. मस्त आहे लेख

    ReplyDelete
  8. Chan pratik, khupach mahatwacha vishay mandala ahe

    ReplyDelete
  9. Khup mast vichar Pratik . .keep doing good things

    ReplyDelete
  10. खूप मस्त प्रतिक खूप मस्त लिहिलं आहेस.

    ReplyDelete